भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी कामाच्या संधी वाढवणे आवश्यक

Share This News

विपुल नैसर्गिक संसाधने, विपुल मनुष्यबळ आणि उपजत उद्योजकीय कौशल्यांमुळे, भारताकडे कृषी, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणताना कामाच्या पुरेशा संधी निर्माण करून अर्थव्यवस्थेला उच्च पातळीवर नेण्याची क्षमता आहे. कोविड महामारीच्या काळात आपण जसे रोजगार आणि उपजीविकेवर त्याचे परिणाम अनुभवले आहेत, तसेच अनेक नवीन संधी उदयास येतानाही पाहिल्या आहेत; ज्याचा फायदा समाजातील काही घटकांनी घेतला आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर जोर देऊ इच्छिते की, रोजगाराच्या या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी संपूर्ण समाजाने अशा संधींचा लाभ घेण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.
अ.भा. प्र. सभेचे चे मत आहे की, मानवकेंद्रित, पर्यावरणास अनुकूल, श्रमप्रधान , विकेंद्रीकरणाचे व लाभांशाचे न्याय्य वितरण करणाऱ्या भारतीय आर्थिक प्रतिमानास (मॉडेल) महत्त्व दिले पाहिजे, जे ग्रामीण अर्थव्यवस्था, सूक्ष्म उद्योग, लघुद्योग आणि कृषीआधारित उद्योगांना प्रोत्साहन देते. ग्रामीण रोजगार, असंघटित क्षेत्र आणि महिलांचा रोजगार आणि अर्थव्यवस्थेतील त्यांचा एकूण सहभाग यासारख्या क्षेत्रांना चालना दिली पाहिजे. आपल्या सामाजिक परिस्थितीनुसार नवीन तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्स अंगीकारण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.
वरील दिशेवर आधारित रोजगार निर्मितीची अनेक यशस्वी उदाहरणे देशाच्या प्रत्येक भागात उपलब्ध आहेत हे विशेष. या प्रयत्नांमध्ये स्थानिक वैशिष्ट्ये, प्रतिभा आणि आवश्यकता देखील विचारात घेतल्या आहेत. अशा अनेक ठिकाणी उद्योजक, व्यावसायिक, सूक्ष्म वित्तसंस्था, बचत गट आणि स्वयंसेवी संस्थांनी मूल्यवर्धित उत्पादने, सहकारी संस्था, स्थानिक उत्पादनांचे थेट विपणन आणि कौशल्य विकास आदि क्षेत्रात प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांमुळे हस्तकला, अन्न प्रक्रिया, घरगुती उत्पादने आणि कौटुंबिक उपक्रम यासारख्या व्यवसायांना चालना मिळाली आहे.
त्या सर्व अनुभवांची एकमेकांसोबत देवाण-घेवाण करताना, जिथे गरज आहे, तिथे ते पुन्हा सांगण्याचा विचार केला जाऊ शकतो. काही शैक्षणिक व औद्योगिक संस्थांनी रोजगार निर्मितीच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कमकुवत आणि वंचित घटकांसह समाजातील एका मोठ्या घटकाला कायमस्वरूपी रोजगार देण्यास सक्षम असलेल्या यशोगाथांचे अ. भा. प्र. सभा कौतुक करते. ‘स्वदेशी आणि स्वावलंबन’ ही भावना समाजात रुजविण्याच्या प्रयत्नांमुळे वरील उपक्रमांना चालना मिळेल.
उच्च रोजगारक्षमता असलेले उत्पादन क्षेत्र बळकट करणे आवश्यक आहे, जे आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करू शकते. समाजात विशेषतः तरुणांना शिक्षण आणि समुपदेशनाच्या माध्यमातून उद्योजकतेसाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे, जेणेकरून ते केवळ नोकरी मिळवण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकतील. महिला, ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातही अशाच उद्योजकीय भावनेला चालना देण्याची गरज आहे. शिक्षणतज्ज्ञ, उद्योग जगतातील नेते, सामाजिक नेते, सामाजिक संस्था आणि विविध संस्था या दिशेने प्रभावी भूमिका बजावू शकतात आणि त्यासाठी सरकार आणि इतरांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अ. भा. प्र. सभेला वाटते की, वेगाने बदलत असलेल्या आर्थिक आणि तांत्रिक परिदृश्याच्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला सामाजिक स्तरावर नाविन्यपूर्ण मार्ग शोधावे लागतील. उदयोन्मुख डिजिटल अर्थव्यवस्था आणि निर्यात क्षमता यातून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींचा सखोल शोध घेतला पाहिजे. रोजगारापूर्वी आणि त्यादरम्यान मनुष्यबळ प्रशिक्षण, संशोधन आणि तांत्रिक नव कल्पना, स्टार्ट अप्स आणि हरित तंत्रज्ञान उपक्रम इत्यादींच्या प्रसारात आपण भाग घेतला पाहिजे.
भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करताना शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रोजगार निर्मितीच्या भारत-केंद्रित मॉडेलवर काम करण्याचे अ. भा. प्र. सभा नागरिकांना आवाहन करते. अ. भा. प्र. सभा समाजातील सर्व घटकांना विविध प्रकारच्या कामांच्या संधी वाढवून आपल्या शाश्वत मूल्यांवर आधारित निरोगी कार्यसंस्कृती प्रस्थापित करण्याचे आवाहन करते. जेणे करून भारत जागतिक आर्थिक पटलावर त्याचे योग्य स्थान मिळवू शकेल.