पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने समाजातील गरीब, गरजू, वंचित घटकातील, तसेच दिव्यांग, कलावंत, वकील, हातगाडी व्यावसायिक, घरेलु कामगार, बांधकाम मजूर यांना ६५० पेक्षा अधिक अन्न-धान्याचे किट वाटण्यात आले. मदतीचा एक हात म्हणून २६ मेपासून अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. या उपक्रमासाठी अतुर फाउंडेशन, सम्यक संस्था व मुकुल माधव फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती ‘रिपाइं’चे राज्य सहसचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली. गरजवंतांना मदत करून रिपब्लिकन पक्षाने तळागाळातील पक्षाची बांधिलकी जपल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सुरु असलेल्या या अन्नधान्य वाटपाच्या या उपक्रमात उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष संजय सोनावणे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, माजी नगरसेवक अशोक कांबळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, मोहन जगताप, शाम सदाफुले, सुशील सर्वगोड, दादाभाऊ वlरभवन, शिक्षण मंडळ सदस्य राजू काटे आदींचा सहभाग आहे.
बाळासाहेब जानराव म्हणाले, “गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे सर्वांनाच शारीरिक, मानसिक व आर्थिक झळ पोहोचली आहे. अनेक घटकांचे रोजगार गेले आहेत. छोटे-मोठे व्यवसाय बंद झाले आहेत. उत्पन्नाचे साधन बंद आहे. त्यातही दिव्यांग व्यक्ती, हातगाडी व्यावसायिक, बांधकाम मजूर व त्यांच्या कुटुंबियांना सर्वाधिक झळ बसली आहे. त्यांना एक मदतीचा हात देऊन दिलासा देण्याच्या उद्देशाने तlडीवाला रोड, येरवडा, विश्रांतवाडी, हडपसर, कोंढवा, पर्वती, कासेवlडी, पत्रा चाळ, भवानी पेठ, भीमपुरा, घोरपडी, मुंढवा आदी भागातील ६५० गरजूंना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचे किट देण्यात आले आहेत.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी सुसंगत ‘नाही रे’ वर्गाला न्याय देण्याचे कार्य पक्षाच्या वतीने या कोरोना काळात करण्यात येत आहे. समाजातील गरीब व गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पक्ष कायमच पुढाकार घेईल, असे संजय सोनवणे यांनी सांगितले.