राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे व पुणे रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार.९ जानेवारी २०२१ रोजी इयत्ता ६ वी ते १० वी च्या राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा सत्राचे आयोजन केले गेले.१२००० हून अधिक विद्यार्थी या सत्रात सहभागी झाले.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड झालेले हे सत्र अठ्ठेचाळीस तासात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिले.राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय विशाल सोलंकी तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक माननीय राहुल द्विवेदी यांच्या पुढाकाराने व परिषदेच्या अधिकार्यांच्या सहकार्याने हा उपक्रम संपन्न होवू शकला.रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टच्या अध्यक्ष रो.कल्याणी गोखले यांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन केले.सुजाण नेट नागरिकत्व स्मार्टफोनचा योग्य वापर,ऑनलाइन गेमिंग,सायबर बुलींग,ऑनलाइन ग्रुमिंग,इंटरनेट अवलंबितत्व इत्यादी विषय या सत्रात हाताळले गेले. रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट गेली तीन वर्ष सायबर सुरक्षा अभियान अविरत चालवत असून आजच्या काळाची गरज असलेल्या या सामाजिक उपक्रमाला पुणे पोलिसांचा ही पाठिंबा आहे.