पुणेकरांना पाहायला मिळणार दुर्मिळ रेडिओचा खजाना*

Share This News

जागतिक रेडिओ दिनी रंगणार ‘रेडिओ उत्सव’; प्रदर्शन, तज्ज्ञांची व्याख्याने आणि प्रात्यक्षिकेही

पुणे : जागतिक रेडिओ दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवारी (ता. १३) रेडिओ उत्सव रंगणार आहे. पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, हौशी रेडिओ परवाना धारक, मुक्तांगण विज्ञान शोधवाटिका केंद्र, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिर्स, पद्मिनी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल कॉलनीतील मुक्तांगण विज्ञान शोधवाटीकेत हा उत्सव साजरा होणार आहे.

या रेडिओ उत्सवात श्रीपाद कुलकर्णी यांच्याकडील जुन्या रेडिओचे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत सर्वाना पाहता येणार आहे. तसेच दुपारी ३:३० ते ६:३० या वेळेत तज्ज्ञांची व्याख्याने आयोजिली आहेत. रेडिओवर प्रश्नमंजुषा स्पर्धाही यावेळी होणार आहे. आकाशवाणीच्या ‘डीआरएम’ या नवीन प्रक्षेपण तंत्राबद्द्ल सहसंचालिका चित्ररेखा कुलकर्णी सादरीकरण करतील. या तंत्राचे प्रदर्शनही भरवले जाणार आहे.

रेडिओ दिवसानिमित्त पुण्यातील हॅम विलास रबडे माहिती देतील. ‘रेडिओ : काल, आज व उद्या’वर विश्वास काळे, ‘एस डी आर रेडिओची रचना आणि विकास’ वर डॉ. विश्वास उडपीकर, ‘रेडिओ ऐकणे माझा छंद’वर दिलीप बापट प्रात्यक्षिकांसह बोलणार आहेत, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री राजेंद्रकुमार सराफ यांनी दिली.