मुंबई दि. 11 कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागानी समन्वय साधून कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे, नाशिक, धुळे, जालना, जळगाव, पालघर जिल्ह्यात दौरे केले होते. त्यावेळी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी विविध सूचना दिल्या.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, कोविडमुळे निराधार झालेल्या महिला आणि बालकांचे काळजी घ्यावी. त्यांचे सर्व्हेक्षण करावे. निराधार झालेल्या महिला आणि मुला, मुलींना राज्य शासनाच्या योजनेची मदत देण्याच्या काम प्रगतीपथावर आहे हे समाधानकारक आहे परंतु सर्व लाभधारकांपर्यंत पोचण्याचे ऊद्दिष्ट ठेवावे .
बालविवाह रोखण्यासाठी पोलीस विभागाने विशेष लक्ष द्यावे. अपहरण झालेल्या किंवा घरातून निघून गेलेल्या मुलींच्या शोधासाठी आणि परत आलेल्या मुलींच्या समुपदेशन करण्यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करावे. पोलीसांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, दक्षता समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत मिळाली असून वात्सल्य योजनेत परिवाराला सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच बालसंगोपन योजनेतून देखील बालकांना ११०० रु मदत दिली जात आहे. कोविडमुळे बेरोजगार झालेल्या कामगार, बांधकाम मजूर, रिक्षा चालक यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करा. याबाबत डाटाबेस तयार करावा. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांची सुरुवात करावी. या योजनेतून पाणंद रस्ते रुंदीकरण कामे हाती घ्यावीत, अशी सूचना त्यांनी विविध जिल्हा प्रशासनाला दिल्या.
महिला बचत गटांना मदत होईल, अशा पध्दतीने काम करावे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून जाणीव जागृती करावी, अशी सूचनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
*पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यांचे विशेष अभिनंदन*
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेल्या उपक्रमांचे विशेष अभिनंदन केले. डॉ. देशमुख यांनी कोविड सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी विशेष महिला पोलीस पथक नियुक्त केले होते. या पथकाने जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरना भेट देऊन महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न केले होते. याचा चांगला उपयोग झाला होता.
बैठकीस पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पुणे ग्रामीण अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जळगाव महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, पुणे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, धुळे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी आपल्या जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली.