दि. ७ नोव्हेंबर २०२१, पुणे : मिती फिल्म सोसायटी, पुणे आणि विवेक व्यासपीठ यांच्या वतीने पुण्यातील मान्यवर चित्रपटकर्मींसाठी स्नेहमिलन आणि दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चित्रपट व नाट्य क्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांसह विविध मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थिती लावली व दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मिलिंद लेले व उपाध्यक्ष अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत करून दीपावलीनिमित्त अभिष्टचिंतन केले व त्यांच्याशी संवाद साधला. हॉटेल श्रेयस येथे आज सकाळी १०:३० ते दुपारी १ या वेळात हा कार्यक्रम पार पडला.
मराठी रंगभूमी व चित्रपटांतून आपल्या अभिनयाचे बहुमूल्य योगदान देणारे सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते योगेश सोमण, विविध मराठी मालिका व चित्रपटांमधून आपल्या दिग्दर्शनाची छाप पाडणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत देवधर, मालिका, चित्रपट तसेच संगीत रंगभूमी यांसह विविध माध्यमांध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मानसी मागीकर, चित्रपट अभिनेत्री अश्विनी गिरी, अभिनेत्री आणि निर्मात्या भाग्यश्री देसाई, मुळशी पॅटर्न व देऊळ बंद फेम अभिनेते रमेश परदेशी व सुनील अभ्यंकर, मराठी मालिका, चित्रपट व वेब सिरीजमधील आघाडीचा अभिनेता पुष्कराज चिरपुटकर, चित्रपट वितरण व जाहिरात क्षेत्रातील विनोद सातव, लेखक व दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर, मिलिंद शिंत्रे, ज्येष्ठ नाट्य अभ्यासक आणि प्रशिक्षक श्यामराव जोशी यांच्यासह ३५ हून अधिक मान्यवर कलाकर या प्रसंगी उपस्थित होते.
मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी यावेळी सोसायटीच्या स्थापनेमागील उद्देश आणि आगामी कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. “सकस व आशयघन चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवून चित्रपट रसिक अधिकाधिक प्रगल्भ होईल यासाठी प्रयत्न करणे या हेतूने मिती फिल्म सोसायटीची दोन वर्षांपूर्वी पुण्यात स्थापना झाली. प्रेक्षक जितका अधिक प्रगल्भ होईल तितका त्याच्यासाठी तयार होणारा चित्रपटही अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल ही यामागची मूळ कल्पना. जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट लोकांना दाखवून, त्यांविषयी चर्चा – परिसंवाद – चित्रपट/लघुपट महोत्सवांचे आयोजन करणे व त्याद्वारे चित्रपटकलेचा प्रचार व प्रसार करणे यासाठी मिती फिल्म सोसायटी प्रयत्नशील राहणार आहे. चित्रपट साक्षरता वाढावी हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे. चित्रपट कला आणि सामाजिक मूल्ये यांचा अभ्यास करणे, कलात्मक मूल्ये असणाऱ्या चित्रपटांच्या तसेच लघुपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे, चित्रपट रसास्वादाची शिबिरे आयोजित करून प्रेक्षकांमध्ये चित्रपट आस्वादनाची क्षमता निर्माण करणे, चित्रपटविषयक संशोधनास मदत करणे या व अशा अनेक पैलूंवर मिती फिल्म सोसायटी येत्या काळात काम करणार आहे.” असे लेले यांनी यावेळी सांगितले.