पुणे : कोरोना काळात काही खाजगी आणि कॉर्पोरेट रुग्णालय, तसेच तेथील डॉक्टर रुग्णांकडून उपचाराच्या नावाखाली नफा कमावण्याचा विचार करीत आहेत. मात्र पुण्यात असेही काही डॉक्टर आहेत की या काळात रूग्णांना मोफत उपचारच नव्हे; तर पदरमोड करून त्यांची सेवा करत आहेत. त्यापैकीच एक आहेत डॉ. कल्याण गंगवाल. त्यांचे संपूर्ण डॉक्टर कुटुंबही यात सहभागी आहे. कोरोना रुग्णांसाठी ते एखाद्या देवदूताप्रमाणे कार्य करत आहे. रुग्णांना आधार देणे, समुदेशन करून त्यांचा मनातून नकारात्मकता काढून टाकणे अशी सर्वकाळ सेवा ते करीत आहेत. आरोग्य आणि मानसिक उपचारांसोबतच डॉ. कल्याण गंगवाल व डॉ. चंद्रकला गंगवाल यांनी स्नुषा डॉ. सीमा पारितोष गंगवाल व नातू सिद्धार्थ पारितोष गंगवाल यांच्या वाढदिवसानिमित्त (९ मे) गरजू कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी १ लाख ११ हजार रुपयांचा निधी दिला आहे.
डॉ. कल्याण गंगवाल आज ७६ वर्षांचे असूनही ते अहोरात्र रुग्णांना सेवा देत आहे. पुना हॉस्पिटल आणि केईम हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन म्हणून गेली ४५ वर्षे प्रॅक्टिस करत असलेले डॉ. गंगवाल वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवीच्या (डीएनबी व इतर) विद्यार्थ्यांनाही शिकवतात. सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या डॉ. गंगवाल यांनी पुढील काळातही त्यांचे व्रत सोडले नाही. उलट आणखी उत्साहाने ते काम करत आहेत. गेल्या वर्षी कोरोना आल्यानंतर लोक दरवाजाआड बंदिस्त झाले. यामधूनही मार्ग काढत रुग्णांची सेवा त्यांनी चालू ठेवली. डॉ. गंगवाल यांनी ऑनलाईन किंवा मोबाईलवर वैद्यकीय सल्ला देण्यास सुरुवात केली. मोबाईलवरून माहिती घेऊन ते उपचार सांगत आहे. ज्यांना आणखी तपशिलात जाऊन माहिती घ्यायची असेल, त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉल करून ते उपचार करतात. सुरुवातीला दिवसाला दहा ते बारा कॉल त्यांना यायचे. आता ही संख्या शंभर व त्यापेक्षा पुढे गेली आहे. केवळ पुण्यातूनच नव्हे; तर संपूर्ण भारतातून त्यांना कॉल येत आहेत.
डॉ. गंगवाल म्हणाले, “वैद्यकिय सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी कोरोना काळात पुण्य करण्याची संधी समजून रुग्णांची सेवा करावी. तुम्ही जितकी लोकांना मदत कराल, तितके कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तुम्हाला परत मिळेल. माझ्या हाताखालील अनेक डॉक्टरांनी माझ्या अनुकरण करीत समाजसेवेचे व्रत स्वीकारले आहे.”
*गरीब नागरिकांना आर्थिक मदत*
गरीब रुग्णांना मोठमोठ्या रूग्णालयात महागडे उपचार परवडत नाहीत. त्यांनाही डॉ. गंगवाल यांनी आर्थिक मदत; पण थेट रूग्णालयाला केली आहे. सर्वजीव मंगल प्रतिष्ठानद्वारे ही मदत केली जाते. आतापर्यंत त्यांनी जवळपास दीडशे रुग्णांना उपचार, औषधे यासाठी मदत केली आहे. या कार्यात त्यांची पत्नी डॉ. चंद्रकला, मुलगा डॉ. परितोष, डॉ. आनंद, सून डॉ. सीमा गंगवाल हे सगळे मदत करतात. डॉ. गंगवाल दाम्पत्याने आपली स्नुषा डॉ. सीमा पारितोष गंगवाल व नातू सिद्धार्थ पारितोष गंगवाल यांच्या वाढदिवसानिमित्त (९ मे) गरजू कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी १ लाख ११ हजार रुपयांचा निधी दिला आहे.
*दिवस-रात्र समुपदेशन सुरु*
डॉ. गंगवाल रुग्णांच्या सोयीनुसार अहोरात्र सेवा देत आहेत. काही दिवसांपूर्वीच अनुभव सांगताना ते म्हणाले, “गेल्या आठवड्यात रात्री दीड वाजता इंदोरवरून कॉल आला. यामध्ये एका कुटुंबाला कोरोना झाला होता. कुटुंबातील तरुण मुलांच्या मनात भीतीने इतकी नकारात्मक भावना भरली होती की, ते एवढ्या रात्री घरातील सर्वांना आता आपण मरणार असे सांगत होते. मात्र नाईलाजाने त्या कुटुंब प्रमुखाने डॉ. गंगवाल यांना कॉल करून सर्वांचे समुपदेशन करण्याची विनंती केली. त्या सर्वांचे समुपदेशन करून त्यांची भीती दूर केली.