पुणे : तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर किती प्रभाव झाला आहे आणि त्याच्या फायद्या सोबत तोट्यांवर प्रकाश टाकत गुन्हेगारी कडे पौगंडावस्थेतील मुलांचा वाढता कल आदी पैलू उलगडणारा सिर्फ एक हा एक क्राइम जॉनरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आज पुण्यात संपन्न झाला असून प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात करण्यात आली. राहुलस् ग्राफिक्सची निर्मिती असलेल्या सिर्फ एक चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल पणशीकर आहेत.सिर्फ एक या हिंदी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यास अभिनेत्री लीना जुमानी , अभिनेता महेश सैनी, सुजित देशपांडे, अनुज प्रभू, देवांशी धामणकर, आशुतोष परांजपे हे चित्रपटातील प्रमुख कलाकार उपस्थित होते. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात सर्वत्र शिरकाव केला आहे. त्याचे अनेक फायदे आहेत तसेच काही तोटे ही आहेत.मागील दोन वर्षांच्या कोव्हिड संकट काळात संगणकीकरणाने आपल्या सर्वांनाच वेगवेगळ्या पातळींवर अनेक प्रकारे मदत झाली. मुलांना ऑनलाईन शाळा करावी लागली आणि त्यांना संगणक व मोबाईल फोन्स च्या मार्फत सोशल मीडियाचं एक दालन अगदी सहजपणे खुलं झालं. एकूणच समाजाचं ह्या सर्व माध्यमांवरचं अवलंबित्व प्रचंड प्रमाणावर वाढलं. ह्या काळात पौगंडावस्थेतील मुलांचा प्रत्यक्ष मैत्री कडून आभासी मैत्रीकडे अत्यंत वेगाने झालेला प्रवास हा भीतीदायक आहे. सुरुवातीच्या साध्या ऑनलाईन मैत्री आणि चॅटिंग मधून नकळत सेक्सटिंगकडे ओढले जाण्याच्या आणि पुढे त्यातून घडणार्या भीषण गुन्ह्यांची संख्या भयानक वेगाने समाजात वाढते आहे. त्यात बलात्कार, ब्लॅकमेलिंग, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि खून, असे अनेक गुन्हे समाजाच्या सर्व थरांमध्ये वाढीस लागले आहेत. आपल्या आसपासही हे लोण वाढत जाताना दिसत आहे. ह्यात अगदी लहान मुलांवरही मानसिक तसेच शारीरिक अत्याचार होतायत….अश्या बातम्या सतत आपल्या कानावर येत आहेत, टेलिव्हिजन वर दिसत आहेत.’सिर्फ एक’ हा ह्या प्रकारच्या गुन्ह्यांवर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. चित्रपटासारख्या एका अतिशय प्रभावी माध्यमाद्वारे एक अशी कहाणी लोकांपर्यंत पोचवावी हा या चित्रपटनिर्मितीमागचा हेतू आहे. ’सिर्फ एक’ जरी पुण्यात घडत असल्याचं चित्रपटात दिसत असलं तरी ही संपुर्ण देशात किंवा जगात कुठेही आणि कोणाच्याही घरात घडू शकणारी गोष्ट असल्याने लोकांना नक्कीच विचार करायला प्रवृत्त करणार हा चित्रपट ठरेल अशी खात्री दिग्दर्शक राहुल पणशीकर यांनी व्यक्त केली आहे.