*संदीप खरे, इंद्रनील चितळे यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार* *याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) १५ वा वर्धापन दिन सोहळा ; अविनाश धर्माधिकारी यांची उपस्थिती*

Share This News

पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारे सृजन युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार लोकप्रिय युवा कवी संदीप खरे आणि चितळे बंधू मिठाईवालेचे इंद्रनील चितळे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेचे श्रीकांत जोशी, अजय कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, अभिजित देशपांडे, मंदार महाजन, निकिता संत, मिलिंद दारव्हेकर आदी उपस्थित होते.

टिळक स्मारक मंदिर येथे शनिवार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाणक्य मंडळाचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी हे असणार आहेत. युवा उपक्रमांतर्गत सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार आणि स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी युवा कलाकार पुरस्कार स्वप्नील जोशी, मनोज जोशी, बेला शेंडे आदींना देण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण सोहळा, वर्धापन दिन कार्यक्रमासह ब्राह्मण उद्योजकांचे एकत्रीकरण हा देखील कार्यक्रमाचा उद्देश आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासोबतच संदीप खरे, इंद्रनील चितळे यांच्या यशस्वी प्रवासाबद्दलची प्रकट मुलाखत ऐकण्याची संधी देखील उपस्थितांना मिळणार आहे. सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या युवा कार्यकारिणीने केले आहे.

कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.