पुणे : “कोरोना महामारीच्या संकटामुळे गरजेच्या वस्तू सुखवस्तू वाटू लागल्या आहेत. एकीकडे राज्यात ‘अनलॉक’ होत असले, तरी अनेकांच्या घरात खाण्यापिण्याचे संकट आहे. त्यामुळे समाजातील गरजूना मदतीचा ओघ यापुढेही चालू राहावा. अन्नधान्य किट, रिक्षाचालकांना सीएनजी कुपन व अन्य स्वरूपात मदत करावी,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘अनलॉक’नंतरही जनतेने मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर व अन्य नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही पाटील यांनी आवाहन केले.
चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) वकील आघाडी, ब्राह्मण आघाडी व चित्रपट आघाडीच्या वतीने दिव्यांग, उपेक्षित लोकांना तसेच तृतीयपंथीयांना अन्नधान्य किटचे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सोमवारी मोदी गणपतीजवळ झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, शिक्षण समितीच्या अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, अभिनेते प्रवीण तरडे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनावणे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, भरत मित्र मंडळाचे बाळासाहेब दाभेकर, ‘संवाद’चे सुनील महाजन, ‘रिपाइं’ वकील आघाडीचे अध्यक्ष व राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, चित्राताई जानगुडे, ॲड अर्चीताताई मंदार जोशी, चित्रपट आघाडीचे सुशील सर्वगोड, ब्राह्मण आघाडीचे अध्यक्ष प्रमोद दिवाकर आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “दिव्यांग कलाकार, उपेक्षित घटक व तृतीयपंथीयांना मदतीचा हात देण्याचा ऍड मंदार जोशी यांचा पुढाकार कौतुकास्पद आहे. गेल्या दीड वर्षांपासून मंदार जोशी व ‘रिपाइं’कडून समाजातील वेगवेगळ्या घटकांना मदत दिली जात आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही जाहीर कार्यक्रम किंवा बॅनरबाजी न करता कार्यकर्त्यांनी गरजवंतांना मदत करावी. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. गरजू रिक्षाचालकांना सीएनजी भरण्यासाठी कुपन्स द्यावेत.”
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणेकरांनी एकत्रित लढा देत कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. आता पुण्यातील निर्बंध शिथिल झाले आहेत. पुन्हा कोरोनाचे संकट येणार नाही किंवा चर्चित तिसरी लाट येणार नाही, यासाठी आपण सर्वानी योग्य ती काळजी घ्यायला हवी. घराबाहेर पडताना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. पुणेकरांचे लसीकरण लवकरात लवकर होईल, यासाठी पालिका प्रशासन पूर्ण तयारी करत आहे.”
गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, तेल, मास्क, सॅनिटायझर आदी जीवनावश्यक वस्तू या किटमध्ये होत्या. जवळपास १०० लोकांना हे किट वाटण्यात आले. सुनीता वाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. ऍड. मंदार जोशी, सुशील सर्वगोड यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.