स्त्री आधार केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) या संस्थांतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी साहित्य मंजिरी या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम दिनांक ६ मार्च रोजी दुपारी २.३० ते ५ या वेळेत दृक्-श्राव्य माध्यमांद्वारे सादर केला गेला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे होत्या. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे स्पष्ट केलं. तसंच त्या म्हणाल्या, “ महिलांचं होणारं शोषण, दमन याविरुद्ध मी एक सुशिक्षित स्री म्हणून काहीतरी केलं पाहिजे हे मला जाणवलं आणि १९८४ सालापासून या विषयासाठी मी काम करत राहिले. *भागिनीभाव हा जागतिक पातळीवर महत्त्वाचा आहे हे मला जाणवलं. याच जाणीवेतून एक मुद्दा पुढे आला तो म्हणजे महिलांनी एकत्र येण्याची गरज आहे कारण एकमेकांच्या मदतीबरोबरच तिचा मतदानाचा जो अधिकार आहे तो गाजवण्यासाठी किंवा तिला समाजात मिळणारं जे दुय्यम स्थान आहे त्याविरोधात सामुहिक चळवळ करणं गरजेचं आहे असं मला वाटते*ं. म्हणूनच स्त्रियांमधील भगिनीभाव, संवेदनशीलता आणि बदलती नाती याविषयी चर्चा करणारा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.”
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. “समाजात लोकांचं असं म्हणणं असतं कि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं कधी फार कौतुक करत नाही. पण मी आज हे सांगू इच्छिते कि स्त्रिया स्त्रियांचं कौतुक नक्कीच करतात आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा साहित्य मंजिरी कार्यक्रम आहे. कारण आज इतक्या मोठ्या व्यासपीठावरून समाजातील दिग्गज महिला, समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या महिला एकत्र येणार आहेत. भगिनीभाव जोपासणं किती महत्वाचं आहे हे अधोरेखित होणार आहे.” असं ज्योती ठाकरे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या निमंत्रक प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन त्यांच्या मिती क्रिएशन्स या संस्थेतर्फे केलं गेलं.
कार्यक्रमात भगिनी भाव, संवेदनशीलता आणि बदलती नाती या विषयांवर परिसंवाद सादर झाला. बडवे ग्रुप या संस्थेच्या कार्यकारी संचालक, उद्योजिका सुप्रिया बडवे, महिला सबलीकरणासाठी झटून काम करणाऱ्या स्वयंसिद्धाच्या कांचन परुळेकर, एड्सग्रस्तांच्या आणि वेश्या व्यवसायातील महिलांच्या हितासाठी कार्यरत समाजसेविका तेजस्वी सेवेकरी, अस्मिता व्हिजन या वाहिनीच्या संपादक आणि मनोरमा बँकेच्या उपाध्यक्ष अस्मिता गायकवाड, माविमच्या माध्यमातून अनेक उद्योजिका घडवून महिलांमधील भगिनी भाव जपणाऱ्या माविमच्या महाव्यवस्थापक, प्रकल्प कुसुम बाळसराफ या मान्यवरांचा परिसंवादात सहभाग होता.
या परिसंवादात सहभागी सर्वच मान्यवरांनी आपली मतं अतिशय उत्तमरीतीने मांडली. स्वयंसिद्धाच्या कांचन परुळेकर म्हणाल्या कि “जेव्हा मी महिलांना एकत्रित करून काम करायला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी मला नकारात्मक गोष्टी सांगितल्या, महिला एकत्रितपणे काम करूच शकत नाहीत अशी मतं मांडली. पण आज मला सांगायला आनंद होतो कि असं काहीच झालं नाही आणि आमच्यातल्या भगिनीभावामुळेच आम्ही एकत्र येऊन काम करू शकलो. आज आम्ही जरी रक्ताच्या नात्याने जोडलेल्या नसलो तरी आम्ही एकमेकींच्या बहिणी आहोत आणि आमच्यातली हा भगिनीभाव, हि संवेदनशीलताच आम्हाला पुढे काम करण्याची उर्जा देत असते.”
“मुलींना समान संधी मिळणं, अगदी घरात वावरताना देखील मुला – मुलींना समानतेची वागणूक मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त एक दिवस महिला दिन साजरा करून ३६४ दिवस स्त्रीला असमानतेने वागवणं, तिच्या मतांना दुय्यम स्थान देणं हे काही खरं नाही. आज मुली – महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रातही हा बदल मी स्वतः अनुभवते आहे. तेव्हा स्त्रियांना समान संधी मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.” असं मत उद्योजिका सुप्रिया बडवे यांनी मांडलं.
एड्सग्रस्त आणि वेश्या व्यवसायातील महिलांसाठी काम करणाऱ्या तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या कि, “आपल्याला जर समाजात लैंगिक शोषणासाठी होणारा मुलींचा व्यापार यासारख्या गोष्टींना प्रतिबंध करायचा असेल तर वेश्या व्यवसायातल्या महिलांच्या संवेदनशीलतेचाच उपयोग करून तो करता येईल. या महिलांमधील भगिनीभाव आणि संवेदनशीलता शाश्वत आहे आणि हेच त्यांचं सामर्थ्य आहे.”
अस्मिता व्हिजन या वाहिनीच्या संपादक आणि मनोरमा बँकेच्या उपाध्यक्ष अस्मिता गायकवाड म्हणाल्या कि माझ्यामते स्त्री विशेषतः भारतीय स्त्री मग ती कुठल्याही प्रांतातली, स्तरातली असो, हि अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे तिला समजून घेणं हे फार कठीण नसतं. समोरच्या व्यक्तीने फक्त तिच्या भूमिकेत जाऊन तिच्या दृष्टीने परिस्थितीचा विचार करणं महत्त्वाचं आहे. पण हा विचारही समाजात कमी होताना दिसतो. म्हणूनच महिलांनीच एकत्र येऊन एकमेकींना समजून घेणं, स्त्री संघटनांची वाढ होणं महत्त्वाचं आहे.”
“बचतगटांना केंद्रस्थानी ठेऊन जर स्त्रीयांमधल्या भगिनीभावाचा विचार केला तर माविमहि महिला सक्षमीकरणातली एक अग्रणी संस्था आहे आणि स्त्रीवादी किंवा स्त्रीकेंद्री साहित्याने जे स्त्रियांना आत्मभान दिलं तेच आत्मभान बचत गटांनी दिलं असं माझं मत आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या सोबत इतर महिलांच्याही हितासाठी काम करणं, एकत्रितपणे पुढे जाणं या भावनांची रुजवात माविम किंवा बचत गट करत असतात.” असं मत माविमच्या महाव्यवस्थापक, प्रकल्प कुसुम बाळसराफ यांनी व्यक्त केलं.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्त्री आधार केंद्र आणि माविमतर्फे काही प्रतिनिधींनी भगिनी भाव म्हणजे नेमकं काय या विषयावर १ मिनिटाचं आपलं मनोगत व्यक्त केलं. स्त्री आधार केंद्रातर्फे, विभावरी कांबळे, अनिता शिंदे, योगेश जाधव, मुक्ता करंदीकर आणि अपर्णा पाठक यांनी मनोगत व्यक्त केलं तर महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे शमीम चौधरी, कांता वाघमारे, सुनीता भंडारे, चंदन शिंदे, सविता माने यांनी मनोगत व्यक्त केलं.
यानंतर कार्यक्रमाच्या समारोप सत्रात कार्यक्रमाच्या अध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना समारोप केला. यावेळी त्यांनी महिला दिनाच्या अनुषंगाने जागतिक पातळीवर होणाऱ्या काही आगामी उपक्रमांची आणि कार्यक्रमांची माहिती देखील दिली. कार्यक्रमाच्या शेवटी स्त्री आधार केंद्राच्या सचिव अपर्णा पाठक यांनी आभार प्रदर्शन केलं.
वरील कार्यक्रम हा दृक्-श्राव्य माध्यमांद्वारे झाल्याने देश – विदेशातील रसिकांना कार्यक्रमाचा आनंद घर बसल्या घेता आला. यापुढे देखील हा कार्यक्रम प्रेक्षक स्त्री आधार केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि मिती ग्रुप या फेसबुक पेजेसवरून पाहू शकतील.