तरुणाईला जोडण्यासाठी भाजयुमोतर्फे ‘युवा वॉरिअर्स’ अभियान* – विक्रांत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती; शिवजयंतीदिनी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन

Share This News

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभर ‘युवा वॉरियर्स’ अभियान राबविण्यात येणार आहे. तरुणाईला जोडणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणार असून, सिंहगड ते सिंदखेडराजा अशी जनजागृती यात्रा होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १९) सकाळी १०.०० वाजता कोंढवे-धावडे येथील दामिनी लॉन्स मंगल कार्यालय येथून होणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘भाजयुमो’चे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वॉरिअर्स राज्य संयोजक अनुप मोरे, सरचिटणीस सुशीलभाऊ मेंगडे, कार्यकारिणी सदस्य गणेश वर्पे, सचिन जायभाये आदी उपस्थित होते.

विक्रांत पाटील म्हणाले, “या उपक्रमाअंतर्गत भाजयुमोच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात आवड असणाऱ्या युवांना जोडून त्यांच्यासाठी त्यांना रुची असणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरुणाईला जोडणारा हा ‘युवा वॉरीयर्स’ उपक्रम आहे. युवक ही भारताची शक्ती आहे. या शक्तीचा सदुपयोग करून देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी युवांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. या युवाशक्तीला दिशा देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्यास त्याचा उपयोग आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी होऊ शकतो. अशा विविध क्षेत्रातील युवांनी या लोकशाहीच्या प्रक्रियेचा भाग व्हावे आणि देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे या हेतूने भाजयुमोतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.”

युवा वॉरिअर्स राज्य संयोजक अनुप मोरे म्हणाले, “हा उपक्रम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा व चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा राबविणार असून, या उपक्रमांतर्गत विक्रांत पाटील त्यांच्या प्रदेशातील सहकाऱ्यांसह राज्यभर युवा वॉरियर्सच्या शाखांचे निर्माण करणार आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत व शहरी भागात वॉर्ड स्तरापर्यंत शाखांचे निर्माण करण्यात येणार आहे, हे तयार झालेले युवा वॉरिअर्स पुढे विविध क्षेत्रातील सातत्यपूर्ण उपक्रम करून युवांना जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या कामात सुशील मेंगडे, राहुल लोणीकर, शिवानी दाणी यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.”