सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले…! कुलगुरूंनी बैठकीचे आश्वासन दिले.

Share This News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सततची अनियमितता दिसून येत आहे. विद्यापीठाकडून परीक्षा उशीरा सुरू करून त्या परिक्षांचा निकालही उशीरा लावण्याचा पायंडाच पडत चालला आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मार्कशीट गरजेची असते. परंतु निकालच उशीरा मिळत असल्याने वेळप्रसंगी विद्यार्थी संबंधित ठिकाणी अर्ज भरू शकत नाहीत. चालू शैक्षणिक वर्षात जवळपास 5 ते 6 महिन्यांचे अंतर पडले आहे. आता लागलेल्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून किंवा विद्यापीठाकडून combine passing, grace marks याबाबत स्पष्टता दिली जात नाही. तसेच संबंधित माहितीमध्ये तफावत दिसून येत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची वेळ आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 8 ते 9 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु पाच महिने होऊनही विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरु नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. सध्याच्या प्रभारी कुलगुरूंकडे अनेक जबाबदाऱ्या असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवादासाठी त्यांच्या भेटीची वेळच मिळत नाही. विद्यापीठाचा सर्व कारभार फोनवर चालू आहे. विद्यापीठातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांचे दर्शन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्णयाविना सरळ सरळ बाजूलाच पडून आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतेच प्रश्न मार्गी लागत नाहीत असा सध्याचा अनुभव आहे. विद्यापीठात एखादा प्रश्न घेऊन गेल्यास आम्हाला हे काम करायला अधिकार नाहीत अशी उडवाउडवीची संबंधितांकडून उत्तरे दिली जातात.
विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वांनाच बसत आहे. यासाठी तातडीने पूर्णवेळ कुलगुरूंची नेमणूक व्हावी आणि लांबणीवर पडलेले शैक्षणिक वर्षाचे नियोजन पूर्ववत करुन विद्यार्थ्यांची पुनः परीक्षा वेळेत घेण्यात यावी. या मागणीसाठी युवक क्रांती दल (युक्रांद) कडून मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे संध्या सोनवणे ओमकार बेनके अजय नेमाने श्याम तोडकर व विद्यार्थी उपस्थित होते.

 

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याशी फोनवर बोलणे झाले गुरुवारी त्यांनी चर्चेसाठी बोलविले आहे. तसेच परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी या आठवड्यात परीक्षा मंडळ व विद्या परिषदेची re exam घेण्याबाबत बैठक घेऊ असे लेखी आश्वासन दिले आहे. आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल.