मार्च २०२० पासून देशावर करोनाचे मोठे संकट आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. उदयोगधंदे, व्यवसाय बंद आहेत. बऱ्याच पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शेतीतील उत्पन्न अल्प आहे. विद्यार्थी एकही दिवस कॉलेजला गेले नाहीत. गेल्या एक वर्षापासून विदयार्थ्याचे शिक्षण Online पद्धतीने चालू आहे. कोणत्याही साधनसामुग्रीचा वापर विदयार्थ्यांनी केला नाही परंतु महाविद्यालयांकडून संपूर्ण फी आकारली जात आहे. यामध्ये Maintenance charges, Laboratory fee, Gym fee, Computer lab fee, Uniform fee, Study Material, Stationary fee, Internet charges, Field work, Extra-curricular activities, Vehicle charges अनेक प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत.
विद्यार्थ्यांनी फी भरावी यासाठी महाविद्यालये दबाव टाकत आहेत. फी न भरल्यास फॉर्म इनवर्ड करून घेणार नाही किंवा internal exam ला बसू देणार नाही अशी धमकी वजा भाषा वापरली जात आहे. विदयापीठाचे फॉर्म इनवर्ड करण्याबाबतचे परिपत्रक असून देखील याबाबत महाविद्यालये विदयार्थ्याना नाहक त्रास देत आहेत. फी भरणे शक्य नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची नामुष्की ओढवली आहे.
अशा आर्थिक अडचणीच्या काळात विद्यार्थी शुल्काचा भार सहन करू शकत नाहीत. कोरोना काळातील महाविद्यालयीन फी कमी झाली पाहिजे या मागणीसाठी युवक क्रांती दलाकडे विद्यार्थ्याच्या गूगल फॉर्मदवारे ५००० पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. त्यासंबंधी युवक क्रांती दलाने (युक्रांद) पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. मा. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी गांभीर्याने या विषयाकडे लक्ष दयावे. अन्यथा युवक क्रांती दलाकडून तीव्र आंदोलन केले जाईल. यावेळी उपस्थितांमध्ये युक्रांद चे संदीप बर्वे (राज्य कार्यवाह), जांबुवंत मनोहर (राज्य संघटक), सचिन पांडुळे (पुणे शहराध्यक्ष), विद्यार्थी प्रतिनिधी जुबेर चकोली, प्रकाश गाडे होते. संपर्क: 9096313022