भारतीय शिक्षण हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. भारताची शिक्षण व्यवस्था जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. सध्या आपण ज्या पद्धतीने प्रगती करत आहोत आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत आहोत त्यामुळे भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच परिवर्तन होईल, असे विधान श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार यांनी केले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ जून २०२३ या कालावधीत “युनिव्हर्सिटी 20” (Uni20) या परिषदेचे आयोजन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे, पुणे येथील कॅम्पस मध्ये करण्यात आले होते. . सदर परिषदेची थीम पुढील प्रमाणे – “विद्यापीठांचे भविष्य- जगाला जगण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवणे- विद्यापीठांची परिवर्तनीय भूमिका”. (“The Future of Universities: Making the World a Better Place to Live in- The Transformative Role of Universities”).
बुधवार, दिनांक २१ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी परिषदेचे समापन सत्र ‘भविष्यातील विद्यापीठे’ या विषयावर आयोजित करण्यात आले होते. श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार यांना या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. नीना अर्नहोल्ड, ग्लोबल लीड, टर्शरी एज्युकेशन आणि लीड एज्युकेशन स्पेशलिस्ट, एज्युकेशन, वर्ल्ड बँक या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रख्यात शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. आर.ए. माशेलकर यांनी सत्राचे प्रमुख भाषण केले. प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार, संस्थापक आणि अध्यक्ष, सिंबायोसिस आणि कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, शिक्षण हे मूल्याधिष्ठित असले पाहिजे अन्यथा त्याचा काही उपयोग नाही. NEP 2020 भारतीय शिक्षणाचे भविष्य तयार करत आहे. अलिकडच्या काळात भारतीय प्रतिभा ही नवनिर्मितीच्या क्षेत्रात झेप घेत आहे. 21व्या शतकात सर्वात मोठे आव्हान आहे “संबंधित राहणे” आणि ते शिक्षण क्षेत्रालाही लागू आहे. शिक्षण प्रणाली नेहमीच संबंधित आणि अद्ययावत राहणे आवश्यक आहे.तंत्रज्ञान हे दररोज बदलत आहे सुसंगत राहण्यासाठी आपण “लर्न – अनलर्न आणि रिलीर्न” या मंत्राचे पालन केले पाहिजे, श्री. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले.
जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा कल्पना जन्म घेतात. विद्यापीठ हे एक असे ठिकाण आहे जिथे जीवन बदलणारे उपाय घेऊन कल्पना जन्माला येतात. जेव्हा कोणी मला प्रश्न विचारतो की “भारतातील विद्यापीठांचे भविष्य काय असेल? माझे उत्तर असेल “सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ” असे देखील श्री. फडणवीस यांनी सांगितले.
डॉ. आर.ए. माशेलकर यांनी आपल्या मुख्य भाषणात नमूद केले की, जेव्हा आपण आपले विद्यार्थी हे भविष्यातील बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार आहेत का असे विचारतो तेव्हा आपल्याकडे भविष्यातील बदलांना जणून घेणारे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना तयार करणारे शिक्षक आहेत का याचा देखील विचार केला पाहिजे. नवीनतम तांत्रिक प्रगतीबद्दल बोलताना ते म्हणाले कि, हे माणूस विरुद्ध मशीन (Man VS Machine)असे नसून माणसांसह मशीन ( its Man with the Machine.)असे आहे. जर तुम्ही मला विचारले की अभियांत्रिकीची कोणती शाखा सर्वोत्कृष्ट आहे तर मी म्हणेन “सोल्यूशन इंजिनीअरिंग”– जी यशाची गुरुकिल्ली आहे. श्रीमंतांसाठी काम करणारे उच्च तंत्रज्ञान तयार करणे सोपे आहे परंतु गरीबांसाठी काम करणारे उच्च तंत्रज्ञान तयार करणे हे आव्हान आहे. आज सर्वसमावेशक नवकल्पनांची गरज असल्याचे देखील डॉ. माशेलकर यांनी नमूद केले.
डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका सिंबायोसिस व प्र – कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) व डॉ. पंकज मित्तल, सरचिटणीस, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रजनी गुप्ते, कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) यांनी आभार प्रदर्शन केले.