पुणे : योग, साधना आणि सत्संग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जगभरातील लाखो नागरिकांचे आयुष्य बदलणा-या गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक लाख पुणेकर सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम करणार आहेत. द आर्ट आॅफ लिव्हिंग तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे हा कार्यक्रम होणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे, अशी माहिती आर्ट आॅफ लिव्हिंग महाराष्ट्रचे अपेक्स सदस्य राजय शास्तारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला आर्ट आॅफ लिव्हिंग महाराष्ट्रचे शेखर मुंदडा, डॉ. राजेश धोपेश्वरकर, बलविंदरसिंग चंडोक, धीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.
शेखर मुंदडा म्हणाले, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगात होणा-या सामुहिक अथर्वशीर्ष पठणाच्या जागतिक विक्रमाची नोंद एशिया बुक आॅफ रेकॉर्डस्, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्, वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् लंडन येथे होईल. आर्ट आॅफ लिव्हिंगचे सुप्रसिद्ध गायक विक्रम हाजरा आणि गायत्री अशोकन हे सत्संगासाठी येणार आहेत.
जागतिक विक्रमाकरिता पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा यांसह सिडनी, अमेरिका यांसारख्या देशांतून ५० हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. जागतिक विक्रमाचे ई प्रमाणपत्र सर्व सहभागींना मिळणार आहे. तरी अधिकाधिक पुणेकरांनी यामध्ये सहभागी व्हावे व नाव नोंदणीकरीता www.gurudevinpune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
*‘विज्ञान भैरव’ कार्यक्रमांतर्गत ध्यानधारणेचे ११२ प्रकार व तंत्र उलगडणार*
द आर्ट आॅफ लिव्हिंग तर्फे रविवार, दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते ६.३० अशा दोन सत्रांमध्ये विज्ञान भैरव या कार्यक्रमाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. यामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर हे शिव व पार्वतीचा संवाद उपस्थितांना आपल्या अमोघ वाणीतून सांगणार आहेत. याशिवाय दैनंदिन जीवनात उपयुक्त ध्यानधारणेचे ११२ प्रकार व तंत्र गुरुदेव सांगणार आहेत. या कार्यक्रमाला विसीनरजाईझ चे धीरज अग्रवाल यांनी विशेष सहकार्य केले आहे.