पुणेः- जगातील शंभरहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या ”सर्वास” या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे विविध देशातून आलेल्या पाहुण्यांना आपल्या परंपरेचा परिचय करुन देण्याची आणि सांस्कृतिक आदानप्रदान करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. दिनांक २२ ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान पाचगणी येथे ”सर्वास इंटरनॅशनल”ची आंतरराष्ट्रीय परिषद आणि सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून यानिमित्त येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे आपल्या घरी आदरातिथ्य करता येणार आहे, अशी माहिती “सर्वास इंडिया”चे राष्ट्रीय सरचिटणीस अभय शहा यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. सतीश देसाई , अशोक पाध्ये, राजेश म्हारोळकर आणि आनंद राजेशिर्के उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभय शहा म्हणाले की, पाचगणी येथे होणारी आंतरराष्ट्रीय परिषद आणि सर्वसाधारण सभेसाठी ५४ देशांतील सुमारे १४५ प्रतिनिधी येणार असून या काळात त्यांना दिनांक २० आणि २१ तसेच २८ आणि २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पुण्यातील विविध कुटुंबांमध्ये त्यांच्या निवासाची सोय करण्यात येणार आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त पाहुण्यांना आपली कवाडे उघडून देण्यात आली आहेत. ज्या पुणेकरांना परदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य करावयाचे आहे, त्यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत संपर्क करणे आवश्यक आहे.
या निमित्ताने आपल्या कुटुंबात परदेशी पाहुण्यांना आपल्या घरी वास्तव्यास ठेवून मैत्रीचे घट्ट नाते निर्माण करण्याची तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या पूर्वी २०१८ आणि २०१९ मध्ये देखील परदेशी पाहुण्यांसोबत ”सर्वास इंडिया” ने आयोजित केलेल्या गणेश फेस्टिवलसाठी अनेक पुणेकरांनी आपल्या घरांची कवाडे खुली करून विविध देशांतील पाहुण्यांसोबत साहचर्याचा निर्भेळ आनंद घेतला होता. ज्यामुळे परस्परांदरम्यान कायमस्वरुपी मैत्रभाव निर्माण झाला जो आजही जोपासला जात आहे.
या परदेशी पाहुण्यांना आपल्या घरी एक ते चार दिवसांसाठी, आपली इच्छा आणि क्षमता यानुसार निमंत्रित करून त्यांच्याबरोबर सहवासाचा आनंद घेता येणार आहे. तसेच भाषा, देश, संस्कृती अशा विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची निवड देखील यजमान कुटुंबाला करता येणार आहे. यासाठी डॉ. सतीश देसाई 9822038272, हर्षा हरताळकर 9021128577, किरण पाटोळे 8411880405, राजेश म्हारोळकर 9823317643, अशोक पाध्ये 98211 99234 आणि विवेक मेढेकर 9822450064 यांच्यापैकी एक व्यक्तीशी संपर्क करणे आवश्यक आहे. तसेच अधिक माहितीसाठी servas.org किंवा servasindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन “सर्वास इंडिया”चे राष्ट्रीय सरचिटणीस अभय शहा, डॉ. सतीश देसाई , अशोक पाध्ये, राजेश म्हारोळकर आणि आनंद राजेशिर्के यांनी केले आहे.