सुवर्णमहोत्सवी वर्षात जनकल्याण समितीतर्फे ‘सेवा भवन’ ची निर्मिती

Share This News

पुणे : रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला रथसप्तमीच्या दिवशी (७ फेब्रुवारी २०२२ ) प्रारंभ होत असून या वर्षात अनेकविध नवे सेवा प्रकल्प समितीतर्फ़े सुरु केले जाणार आहेत. या वर्षात जनकल्याण समितीतर्फे पुण्यातील एरंडवणे परिसरात ‘सेवा भवन’ ही वास्तू साकारणार आहे. अत्यल्प दरातील डायलिसीस केंद्र तसेच रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व भोजन व्यवस्था सेवा भवन मध्ये असेल.

जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . समितीचे कार्यवाह तुकाराम नाईक यावेळी उपस्थित होते.

पुण्यात एरंडवणे – पटवर्धन बाग परिसरात ‘सेवा भवन’ ही आठ मजली वास्तू उभी केली जात आहे. त्यातील एका मजल्यावर पंधरा बेड्चे डायलिसीस सेंटर असेल . तसेच तीन मजल्यावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी छत्तीस खोल्या बांधल्या जाणार आहेत. तेथील भोजन व निवास व्यवस्था अत्यल्प दरात असेल.

या वास्तूतील एका मजल्यावर जनकल्याण समितीचे निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची योजना आहे. वैद्यकीय समुपदेशन कक्षही चालवला जाणार आहे. ही आठ मजली इमारत एकोणतीस हजार चौरस फुटांची असेल .

सुवर्णमहोत्सवी वर्षात जनकल्याण समितीतर्फे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत असलेल्या व्यक्ती तसेच संस्थांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ ७ फेब्रुवारी २०२२ रोजी होईल.

जनकल्याण समितीतर्फे महाराष्ट्र प्रातांत सेवेचे सात मोठे प्रकल्प चालवले जात असून लहान मोठी १५८० सेवाकार्ये चालविली जात आहेत. यात प्रामुख्याने शिक्षण, संस्कार, आरोग्य, कृषी आणि पर्यावरण, अन्नपूर्णा प्रकल्प, पूर्वांचल छात्रावास, ग्राम आरोग्य रक्षक, निवासी विद्यालय, आपत्ती विमोचन आदी

अनेक कामांचा, क्षेत्रांचा समावेश आहे. सहा हजारांहून अधिक महिला पुरुष कार्यकर्त्यांचे या सेवा कार्यांमध्ये योगदान आहे.

फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रकल्प समितीतर्फे १६ जिल्ह्यात चालवला जातो. चालू वर्षात आणखी ९ जिल्ह्यात या प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे. तसेच २०० रुग्ण उपयोगी साहित्य केंद्रांचे ऑनलाईन अँप आणि पोर्टलची निर्मिती या वर्षात केली जाईल.

सोबत वास्तूचे संकल्प चित्र जोडले आहे.