*रा.स्व संघ प्रचारक संदीप आठवले यांचे निधन*

Share This News

पुणे दि.६ -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील परळ विभागाचे प्रचारक संदीप माधव आठवले (वय ४८) यांचे आज पहाटे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आठवले यांना ३० ऑक्टोबरला मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने मुंबईतील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील यशवंत भवन येथे आणि दुपारी पुण्यातील शनिवार पेठेतील नेने घाट येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले होते. दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांचे काका प्रकाशराव आठवले यांनी अंत्यसंस्कार केले.
यावेळी कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रविण दबडघाव, मुंबई महानगर कार्यवाह संजय नगरकर, पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, पश्चिम क्षेत्र संपर्क प्रमुख कैलाश सोनटक्के तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
*अल्प परिचय*
संदीप आठवले तरुणपणी संघाच्या संपर्कात आल्यानंतर शाखा आणि नगर स्तरावरील विविध जबाबदाऱ्या घेऊन त्यांनी पुण्यातील मोतीबाग नगरात काम केले. ते १९९४ ते ९७ या कालावधीत रायगड जिल्ह्यात प्रचारक होते. त्यानंतर पुन्हा मोतीबाग नगर कार्यवाह, कसबा भाग कार्यवाह-सहकार्यवाह, पुणे महानगर शारीरिक शिक्षण प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्यांनी २०११मध्ये पुन्हा एकदा प्रचारक म्हणून जाण्याचा निर्णय घेतला. २०११ ते २०१५ उत्तर कोल्हापूर जिल्हा प्रचारक, २०१५ ते १८ मुंबईत गोरेगाव विभाग प्रचारक आणि त्यानंतर परळ विभाग प्रचारक म्हणून त्यांनी काम केले.
त्यांनी अनेक वर्षे संघ शिक्षा वर्गात शिक्षक म्हणून काम केले. उत्कृष्ट समता करणाऱ्या संदीपजींचे दंड, दंडयुद्ध, पदविन्यास हे शारीरिकमधील आवडीचे विषय होते. ते २०१५पासून वर्गांमध्ये बौद्धिक विभाग सांभाळत होते. उत्तम गीतगायक असणाऱ्या संदीपजींच्या आवाजातील संघप्रार्थना अनेकांच्या स्मरणात आहेत.