महाराष्ट्र – ओडिशा, गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघांना विजेतेपद एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा : दोन्ही गटात मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संघाला उपविजेतेपद

Share This News

पुणे : मुलींच्या गटातून महाराष्ट्र – ओडीसा संयुक्त संघाने तर, मुलांच्या गटातून गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने, महाराष्ट्र रोलबॉल संघटना व जिल्हा रोलबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण आरएलएमएसएसचे विंग कमांडर एम. याग्नावनम, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष अमोल काजळेपाटील,पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासक प्रा. प्रणेती लवंगे, आरएलएमएसएसचे प्रशिक्षक गजानन माळी, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००१६ साली मांडली.या अंतर्गत विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात व त्यात २/३ राज्यातील खेळाडूंची एक टीम तयार केली जाते आणि अश्याच पद्धतीने तयार केलेल्या दुसऱ्या टीम सोबत खेळ रंगतो असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.याद्वारे विविध राज्यातील खेळाडुंमध्ये परस्पर स्नेह वृद्धिंगत होतो व देशभरातील सर्व खेळाडू एकमेकांशी जोडले जातात. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून कोण जिंकले यापेक्षा खेळ भावना जिंकली आणि एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मूर्त स्वरूपात आल्याचे समाधान वाटते असेही खर्डेकर म्हणाले. याच उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा रोलबॉल संघटनेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुलीच्या गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र – ओडिसा संघाने मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संघाला ५-३ असे पराभूत केले. मध्यंतराला महाराष्ट्र – ओडीसा संघाने ४-१ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्र – ओडीसा संघाकडून महेक राऊतने ३ (२.३०, ४.४०, ९.१८ मिनिटे) तर श्रुती भगत (५.४० मिनिटे) व वैभवी मुदगल (२९.४५ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संघाकडून अश्विनी बनोलीया (२.०१ मिनिट), वर्निका उपाध्याय (२५.३० मिनिटे) व खुशी वानखेडे (२८.२६ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मुलांच्या अंतिम फेरीत गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघाने मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड प्रदेशाच्या संयुक्त संघाला ७-४ असे पराभूत केले. गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघाने मध्यंतराला ५-१ अशी आघाडी घेतली होती. गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघाकडून झंकृत अघेराने ५ (५.०७, ७.४५, १४.०६, २७.११, २८.१३ मिनिटे) तर यश रसिया (१.५१ मिनिटे) व भारत सिन्हाने (८.४३ मिनिटे) प्रत्येकी एक गोल केला. मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संघाकडून गुरुवचन सिंग (७.०७ मिनिटे), दीपन सिंग (१८.४२ मिनिटे), सुजय कुमार (२०.१० मिनिटे) व अभिषेक कुमारने (२२.३६ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

तत्पूर्वी मुलांच्या गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीत मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संयुक्त संघाने उत्तरप्रदेश-अरुणाचल प्रदेश – मेघालयच्या संयुक्त संघाला २२-७ असे एकतर्फी पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलांच्याच गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गुजरात – छत्तीसगड संघाने महाराष्ट्र – ओडीसा संघाला ११-९ असे पराभूत करताना अंतिम फेरी गाठली होती.