भारतीय हवाईदलामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारे एअर मार्शल प्रदीप पद्माकर बापट यांना सोमवारी (२२ नोव्हेंबर) *परमविशिष्ट सेवा पदक* प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवन येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख *राष्ट्रपती रामनाथ कोविंद* यांच्याहस्ते हा पुरस्कार देऊन प्रदीप बापट यांना सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
गेल्यावर्षी एअर मार्शल बापट यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता मात्र करोना प्रतिबंधामुळे पुरस्कार प्रदान सोहळा प्रलंबित राहिला होता.
१९८३ मध्ये प्रदीप बापट हे हवाईदलात रुजू झाले.यांनी उपकरण डेपोचे मुख्य प्रशासकीय अधिकारी,मिराज लढाऊ विमानांच्या डेपोचे उपमुख्य प्रशासकीय अधिकारी तसेच सुखोई -३० तळाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून यशस्वीरित्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.भारतीय हवाई दलाच्या विविध सराव कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.दक्षिण आफ्रिकेतील ‘हॉऊईडस्प्रुड’ येथे दक्षिण हवाई दलासोबत ‘गोल्डन ईगल नामक संयुक्त सरावात सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या सदस्यांमध्ये प्रदीप बापट यांचा सहभाग होता.
उज्जैन येथील विक्रम विद्यापीठातून त्यांनी प्राणिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.प्रदीप बापट यांचे वास्तव्य पुण्यातील कर्वेनगर येथे असून ते उत्तम क्रीडापटू व संगीतप्रेमी आहेत.
गोल्फ,बॅडमिंटन व सायकल पोलो यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून दोन वेळा राष्ट्रीय सायकल पोलो अजिंक्यस्पर्धेत मध्य प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.सध्या सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष आहेत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ओळ-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद एअर मार्शल प्रदीप बापट यांना परमविशिष्ट सेवा पदक पुरस्कार प्रदान करतांना
22 नोव्हेंबर 21