पुणे, ता. ३१: या वर्षी गेल्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच श्री गणेशाचे आगमन राज्यात, घराघरात आणि आमच्याही पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील घरात सहर्ष झालेले आहे. आमच्याकडे ही परंपरा गेली अनेक वर्षे आहे. आम्हीही कुटुंबातील सर्वजण मनोभावे श्री गणेशाचे पूजन करत असतो. गौरींचे आगमन आणि स्वागतही मोठ्या आनंदाने आमच्या परिवारात होते.
या वर्षी देखील गणेशोत्सवात अनेक गोष्टी जन – सामान्यांना जाणवत आहेत. कोरोनाचा कालावधी संपला असला तरी त्याच्या काही आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात आजही घर करून आहेत. यावर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक असावा अशी भावना यावेळी सर्वांचीच आहे. जागतिक पातळीवर तापमानवाढ, अतिवृष्टी, वादळे अशी विविध संकटे येत आहेत यामुळे पर्यावरणावर आता सर्वाचेच लक्ष राहणार आहे.
महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महागाईचा त्रास हा सर्व सामान्य जनतेला अधिक होत आहे. गॅस सिलेंडर हा त्यांच्या मासिक बजेटच्या पुढे गेल्याने आवाक्याच्या बाहेर जात आहे. पण तरीही ते सणसुदीच्या काळात आपला आनंद व्यक्त करीत आहेत.
खरेतर कोणतीही महिला, सामान्य जनता, असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्या वाट्याला कोणतीही अवहेलना येऊ नये. परंतु, एका आदिवासी महिलेला एका वरिष्ठ पातळीवरील महिलेने चटके देण्याची अतिशय क्रूर घटना नुकतीच घडली आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करते. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत अशीच भावना यावेळी माझी आहे. एकूणच महिलांच्या सुरक्षिततेला आवाहन देणार्या अनेक घटना समाजात घडत आहेत.
पोलिसांवर सर्व घटनांचा आणि व्यवस्थेचा ताण असतो अशा वेळी समाजाने पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. गणेशोत्सव आणि इतर वेळीदेखील सामाजिक सुरक्षा अधिकाधिक राखण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेला समाजाने प्राधान्य देऊन प्रत्येकाने अशा सुरक्षाविषयक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी मी करीत आहे.
महाराष्ट्राच्या विधान परिषदेची उप सभापती आणि शिवसेनेची उपनेता या नात्याने पुणे, मुंबई आणि राज्यातील सर्व जनतेला या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा मी देत आहे.
डॉ. नीलम गोर्हे