मुंबई, ता. ७ : ‘कोरोनामुळे राज्यात अनेक कुटुंबांवर संकट कोसळले आणि कुटुंबातील करती व्यक्ती अचानक निधन पावल्याने कुटुंबच डळमळीत झाले अशा अनेक घटना मागील दोन वर्षांत घडल्या. महाराष्ट्राचे समाज जीवन यामुळे ढवळून निघाले. अशा आपत्तीत सापडलेल्या महिलांच्या स्थितीचा स्त्री आधार केंद्राने केलेला अभ्यास पुढील उपाय योजना ठरविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल,’ असे प्रतिपादन आज विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे निंबाळकर यांनी येथे केले.
स्त्री आधार केंद्र, पुणे या महिला सक्षमीकरण करणाऱ्या सामाजिक संस्थेने तयार केलेल्या महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यातील कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांच्या कोरोनाविषयक स्थितीच्या “स्वयंसिध्दा” या अहवालाचे प्रकाशन आज विधान भवनात विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते
विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्री आधार केंद्राच्या ‘स्वयंसिद्धा’ या अहवालाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर केले. यावेळी त्या म्हणाल्या, ‘या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या संकटात सापडलेल्या महिलांनी नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याकडे आपली पसंती दर्शविली आहे. विधवा महिला अथवा त्यांच्या कुटुंबाना केवळ आर्थिक स्वरूपात मदत मिळण्यापेक्षा या व अशा अनेक कारणांनी एकल राहणाऱ्या महिलांचा सामाजिक दर्जा उंचावला जावा यासाठी प्रयत्न होण्याची अधिक अपेक्षा आहे. विदर्भातील एका ठिकाणी तर वैधव्य आलेल्या एका स्त्रीला केशवपन करण्याचा प्रसंग ओढवला होता जो तिने मुकाबला करून परवतून लावला. या आणि अशा अनेक महिलाची वस्तुस्थिती या अहवालात मांडण्यात आली आहे.’ या अहवालासाठी मदत केलेल्या अनेक व्यक्ती आणि संस्थाचे त्यांनी वेळी आभार मानले.
यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘राज्य सरकारने कोविडमुळे निधन झालेल्या पालकांच्या पाल्यांचे शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घेण्याचा निर्णय घेतला आहे पण तरीही ही गोष्ट इथेच संपणार नाही तर या मुलांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची गरज आहे. त्यासाठी स्त्रीं आधार केंद्राचा हा अहवाल नक्कीच मार्गदर्शक होईल असा विश्वास आहे.’
महिला बाल विकास मंत्री ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘राज्य सरकारच्या वात्सल्य योजनेचा आधार घेऊन या कुटुंबासाठी आणखी काय करता येईल याबाबत अधिक विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरु आहे. स्त्री आधार केंद्राचा हा अहवाल अतिशय स्तुत्य उपक्रम असून याचा उपयोग नक्कीच अशा प्रकारची धोरणे ठरविताना होईल.’
राज्यमंत्री ना. आदिती तटकरे म्हणाल्या, ‘स्त्रियांच्या प्रश्नावर काम करणे आणि त्या प्रश्नांमध्ये झोकून देऊन काम करणे हे अतिशय आवश्यक आणि जिकीरीचे काम आहे. या माध्यमातून केवल त्या सरीचे नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होत असते. कोवि
ड काळात अशा अनेक महिलांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यांना यातून समोर आलेल्या विविध प्रसंगामधून नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या सर्वांचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. याचा फायदा राज्यातील महिलाना नक्कीच होईल’.
या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री ना. श्रीमती यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री ना. आदिती तटकरे, विधानसभा सदस्य आ. दीपक केसरकर, विधानपरिषद सदस्या आ. मनीषा कायंदे, प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत आदि मान्यवर उपस्थित होते.
दुरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, सचिव अपर्णा पाठक, मृणालिनी कोठारी आणि अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यकमाचे प्रास्ताविक नंदकिशोर लोंढे यांनी केले तर उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर यांनी आभार मानले.