*पुणे शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत येऊन काम करावे-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे*

Share This News

पुणे, दि.२५:- पुणे शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत येऊन पारदर्शकपणे काम करण्याचे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले.

पुण्यातील ‘अँमिनिटी स्पेस’ बाबत क्लब ऑफ इन्फ्लुएन्सरच्या वतीने आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे, मुकुंद किर्दत आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, नागरिकांना सुविधा देतांना विनामूल्य किंवा माफक दरातील आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. सुविधा नागरिकांच्या फायद्यासाठी असल्या पाहिजेत. शहराच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने महिला सुरक्षितता महत्त्वाचा विषय आहे. मुंबई व ठाणे शहरात ‘अँमिनिटी स्पेस’ चा वापर कशाप्रकारे झाला आहे याबाबत माहिती घेतली जाईल.

गरीब, मध्यमवर्गीय लोकांना ‘अँमिनिटी स्पेस’ कसे उपलब्ध करुन देता येईल, याचा विचार करावा. ‘कार्बन न्यूट्रल’ आराखडाबाबत कृती गटासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली आहे, त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, अँमिनिटी स्पेस बाबत विकास आराखड्यात नियोजन केले पाहिजे. उपलब्ध जागेचे संरक्षण केले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीचा विचार करता खुल्या जागा जास्तीत जास्तीत संरक्षित ठेवणे गरजेचे आहे. ‘नागरी जंगल’ (urban forest) ही काळाची गरज आहे.

आमदार श्री शिरोळे, माजी प्रशासकीय अधिकारी श्री. झगडे, ‘सीओइपी’चे प्रा. रावळ, सभागृह नेते श्री. बिडकर यांच्यासह आदि मान्यवरांनी ‘अँमिनिटी स्पेस’ बाबत आपआपली मते मांडली.