तिसर्या लाटेची तयारी मोठ्यानी व्यवस्थित केल्यास मुलेही त्याचे अनुकरण करून लाटेतुन निभावून नेतां येतील ‘:स्त्री आधार केंद्र परिसंवादातील निष्कर्ष*

Share This News

स्त्री आधार केंद्र, पुणें आणि महिला प्रबोधन व्यासपीठ, महाराष्ट्र आयोजित ‘कोव्हिड काल आज आणि उद्या’ या एका विशेष दृक्-श्राव्य कार्यक्रमाचा दुसरा भाग शनिवार दिनांक १९ जून २०२१ रोजी प्रेक्षकांसमोर सादर झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाच्या अध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अध्यक्षीय भाषण केलं. कोव्हिड काळात कोरोना बाधित रुग्णांच्या समस्यांबरोबरच स्त्री आधार केंद्राचं दैनंदिन मदत कार्य देखील अविरत सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या पुढे म्हणाल्या की, “या संपूर्ण कोव्हिड काळात समाजात दोन प्रकारची मानसिकता दिसून आली. एकीकडे आम्ही लॉकडाऊनला विरोध करणार, मास्क वापरणार नाही, एखाद्या पदार्थातून काही संसर्ग होतंच नाही अशी मतं असणारी मंडळी होती तर दुसरीकडे अनेक प्रकारचे काढे, इतर काही मार्ग, दिवसभरात करायच्या काही ठराविक गोष्टी याविषयीची मतं मंडळी गेली. खरंतर आयुर्वेदाला महत्त्व आहेच. मी स्वतः आयुर्वेदाची पदवीधर आहे, पण जशी शरीराला गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही औषधं आणि आहार जर घेतला तर त्याचा उपयोग होत असतो. जर तुम्ही औषध आहाराप्रमाणे घेतलं आणि आहार औषधासारखा घेतला तर तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपला विवेक वापरून लोकांनी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.” या प्रसंगी कोव्हिड सेंटर्समधील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या १२ कलमी कार्यक्रमाविषयी देखील मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणानंतर विभावरी कांबळे यांनी कार्यक्रमाच्या मागील पहिल्या भागाचा आढावा प्रेक्षकांसमोर सादर केला.

या कार्यक्रमातील चर्चासत्रात जम्बो कोव्हिड सेंटर : स्वरूप आणि आव्हाने याविषयी *डॉ. राजेश ढेरे, अधिष्ठाता, BKC जम्बो कोव्हिड फॅसिलीटी, नोडल अधिकारी जम्बो सेंटर*यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. “साधारण एप्रिल महिन्यात BKC मधील जम्बो कोव्हिड सेन्टरच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला आणि हे जगातील दुसरं, आपल्या देशातील पहिलं ट्रान्जिट हॉस्पिटल आहे जिथे आपण पहिला ट्रान्जिट हॉस्पिटलचा हा प्रकल्प राबवला. आज *या सेंटरमधून आम्ही जवळजवळ २६,७०० रुग्ण अवघ्या १३ महिन्यात बरे करून सुखरूप घरी पाठवले आहेत. BKC नंतर आज मुंबईत इतर ७ जम्बो सेन्टर्स आहेत जिथे देखील अहोरात्र उपचार आणि काम सुरु आहे*.” असं डॉ. ढेरे आपल्या मनोगतात म्हणाले. याव्यतिरिक्त जम्बो सेंटर्समधील व्यवस्थापनात आलेल्या अडचणी आणि त्यावर यशस्वीरीत्या केलेली मात याविषयी देखील त्यांनी माहिती दिली.

यानंतर लहान मुलं आणि कोरोना याविषयी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बालशल्यविशारद *डॉ. मीनाक्षी नलबले – भोसले*यांनी मार्गदर्शन केलं. *कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणाऱ्या संभाव्य धोक्याविषयी त्या बोलल्या. आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या, “तिसरी लाट कधी येणार आहे, त्यामध्ये आपलं मुल बाधित होणार आहे कि नाही, किती गंभीर हा कोव्हिड असणार आहे याविषयी सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहेत. तेव्हा या सगळ्या विपरीत परिस्थितीवर केवळ प्रतिक्रिया न देता या परिस्थितीला आपण कशाप्रकारे प्रतिसाद देतो यावर तिसऱ्या लाटेचा प्रभाव अवलंबून आहे. *मुलं हि कायम पालकांचं किंवा मोठ्यांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे घरातल्या मोठ्यांनी वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर मुलांनाही त्याची सवय होईल आणि आपल्याला योग्य प्रतिबंध करता येईल*.” याबारोरच सध्याच्या काळात शासनातर्फे करण्यात आलेल्या योग्य उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्वांविषयी देखील डॉ. मीनाक्षी बोलल्या.

याबरोबरच कोव्हिड १९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांचे अनुभव देखील कार्यक्रमात समाविष्ट होते. पत्रकार वैभव वझे आणि व्यावसायिक कला जोशी यांनी कोव्हिड सेंटरमध्ये असतानाचे आपले अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले.
तसंच मिलिंद सुर्वे, यशश्री व श्रीकांत मालापूर, अशोक तांगडे, यांनी कोव्हिड काळातले त्यांचे अनुभव व्हिडीओज च्या माध्यमातून व्यक्त केले आणि माधुरी चिटणीस यांनी कवितेच्या माध्यमातून आपले अनुभव मांडले.

या  कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी केले. संयोजन स्त्री आधार केंद्र व  मिती क्रिएशन्स  या संस्था तर्फे करण्यात आलं. हा कार्यक्रम स्त्री आधार केंद्र पुणे (Stree Aadhar Kendra) आणि Miti Group या फेसबुक पेजेसवर तसंच Miti Group Digital या युट्युब चॅनलवरून प्रसारित करण्यात आला.
यापुढील शनिवारी म्हणजेच दिनांक २६ जून रोजी कार्य्केमाचा पुढील भाग सादर होईल. या भागात ‘हॉस्पिटल्समधील काळजी आणि सुरक्षितता’ या विषयावर चर्चासत्र होईल ज्यात अशोक दुधे, रायगड, डॉ जगन्नाथ दीक्षित आणि रोहिणी घुमे, सिस्टीम इन्चार्ज, जसलोक हॉस्पिटल या मान्यवरांचा सहभाग असेल.
त्यापुढील शनिवारी म्हणजेच ३ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता कोविड काल आज आणि उद्या या कार्यक्रमाचा चौथा भाग सादर केला जाईल.

या प्रत्येक भागात नागरिकांना आलेले सकारात्मक अनुभव देखील व्यक्त केले जातील. या अनुषंगाने नागरिकांना आपले अनुभव ५०० शब्दात लिहून पाठवण्याचं आवाहन देखील आयोजकांनी केलं आहे. तेव्हा आपले अनुभव ९९३०११५७५९, या क्रमांकांवर व्हॉट्सअॅपद्वारे पाठवा किंवा streeaadharkendra@gmail.com / neelamgorheoffice@gmail.com या ई-मेल आयडीवर मेल करा. अधिक माहितीसाठी संपर्क – ९०२८३३३३०५/०६
एकूणच सध्याच्या या निराशावादी वातावरणात बदल करून काही प्रेरणादायी अनुभवांच्या मदतीने एक आशावादी वातावरण तयार करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
चला तर मग जीवनाबाबत आशावादी राहूया आणि एकत्र येऊन एक संवेदनशील समाज घडवूया!!!