पुणे दि ०३: कोरोना महामारीमुळे बुधवार पेठ येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची विनंती येथील महिलांनी विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. याबाबत उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांनी महिला व बाल विकास विभाग यांच्याशी संपर्क करून धान्य वाटपाबद्दल चर्चा केली. त्यानंतर बुधवार पेठेतील १०० महिलांकरिता अन्नधान्याची सोय करण्यात आली.आज या अन्नधान्याच्या किटचे वाटप ‘ केअर फॉर यू’ या स्वयंसेवी संस्थेच्या’ श्रीम.पायल राठी यांच्या वतीने आणि स्त्री आधार केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
या प्रसंगी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे महिलांशी संवाद साधला.तसेच सध्या कोरोणाचे संकट वाढत असल्याने दुहेरी मास्क वापरण्याचेही सर्व महिलांना आवाहन केले.तसेच पुढील काळात देखील महिलांना वेळोवेळी मदत केली जाईल असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
महिला व बाल विकास विभागातून देण्यात आलेले अनुदानासाठी स्त्री आधार केंद्राच्या श्रीम.अश्विनी शिंदे यांनी १५०० महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते उघडून या महिलांना शासनाच्या सर्व मदत मिळून देण्यासाठी कार्य करत असतात, असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. सर्व वाटपाचे नियोजन स्त्री आधार केंद्राच्या श्रीम.अश्विनी शिंदे, महाराष्ट्र तरुण मंडळाचे सल्लागार श्री.राजेंद्र शिंदे यांनी केले होते.