मुंबई दि.24 – थळ आणि नवगाव येथे मच्छिमारांना बोटी बांधण्यासाठी जेट्टी बांधणे, खोदकाम करताना निघणा-या दगडांचा वापर चॅनलच्या बाजूने बंधारा बांधण्यासाठी करणे,मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फटिलायझर्स (आरसीएफसी)कंपनीसह मेरिटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाने कार्यवाही करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे यांनी दिले. आज दुरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय केमिकल्स ॲड फटिलायझार्स लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या मच्छिमार बांधवांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी संबंधित अधिका-यांना अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या मागण्यांसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, मच्छिमार महिला आणि बांधवांच्या समस्या दूर करण्यासाठी बंदराकडे जाणा-या रस्त्यावर प्रसाधनगृहे पावसाळ्यापुर्वी उभारणे आवश्यक आहे. ही फिरती किंवा तात्पुरती सार्वजनिक शौचालये तातडीने आठ दिवसात उभारावीत. आरसीएफ कंपनी रसायनयुक्त सांडपाणी पाण्यात सोडत असल्याने प्रदुषण वाढून मासे मृत पावत असल्याचे स्थानिक आमदारांनी यावेळी निदर्शनात आणून दिले. यासंदर्भात आरसीएफसी ने स्वतः सर्व्हे करून प्रदुषण नियामक मंडळाला कळवावे. व त्यावरती प्रदूषण मंडळाने आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश आरसीएफसीला उपसभापती यांनी दिले. याचबरोबर बोटी बांधण्यासाठी जेट्टी उभारण्यासंदर्भात उपलब्ध निधीतुन आरसीएफ ने कार्यवाही सुरू करावी. प्रत्येक जिल्ह्यासाठी नाविन्यपुर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो, या निधीमार्फत मच्छिमार बांधवांसाठी सुविधा पुरविण्याची कामे करता येतील का यासंदर्भात अहवाल सादर करावा. या परिसरातील प्रकल्पबाधितांना मुलभुत सोयी-सुविधा पुरविणे अत्यावश्यक असल्याने या कामास गती द्यावी. मेरीटाईम बोर्ड आणि मत्स्यव्यवसाय विभागाने आपल्या विभागाच्या अखत्यारित येणा-या कामांना गती देऊन ती पुर्ण करावी असेही उपसभापती डॉ निलम गो-हे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस विधानपरिषद सदस्य रमेश पाटील, विधानसभा सदस्य महेंद्र दळवी, मेरी टाईम बोर्ड चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित सैनी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, आरसीएफचे अध्यक्ष श्रीनिवास मुडगेडीकर , मुख्य किनारा अभियंता रूपा गिरासे, आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.