मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून प्रस्थान

Share This News

पुणे ः प्रतिनिधी

जय शिवाजी जय भवानी…. छत्रपती शिवाजी महाराज की जय… एक मराठा लाख मराठा… चा जयघोष करीत मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा आयोजित मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून साष्टपिंपळगाव कडे प्रस्थान झाले.
मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने आयोजित या यात्रेचा शुभारंभ कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर, रघुनाथ चित्रे पाटील, हनुमंत मोटे, किशोर मोरे, मीना जाधव, श्रृतिका पाडाळे, जितेंद्र कोंढरे, सारिका कोकाटे, विनोद साबळे, अंकुश कदम, नाना निवंगुणे, अनिल ताडगे, जगजीवन काळे यांसह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. ही यात्रा उद्या शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बीड येथून पुन्हा सुरुवात होऊन बीड ते पाडळसिंगी, गेवराई, शहागडमार्गे जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.
कुंजीर म्हणाले की, पुणे शहर, जिल्ह्यातून तसेच रायगड, मुंबई येथून 42 वाहनांतून हा मोर्चा साष्टपिंपळगाव कडे मार्गस्थ झाली आहे. जनजागृती करण्यासाठी सर्वात पुढे रथ असणार आहे. येरवडा, वाघोली, सुपा, नगर, अंबळनेरमार्गे बीडला पोहचतील. ठिकठिकाणी या मोर्चाचे स्वागत झाले आहे. पोलिस प्रशासनाला मोर्चाच्या परवानगीसाठी पत्र व्यवहार केला असून शिस्तबध्द पध्दतीने हा मोर्चा आंदोलनाकडे मार्गस्थ झाला आहे.
चित्रे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळाकढूपणा काढत आहे. साष्ठ पिंपळगावातील मराठा बांधवांनी जो ठिया आंदोलनातुन संघर्ष सुरु केला आहे, त्यांना पाठिंबा देवुन या लढ्याला बळकटी देण्यासाठी या संघर्ष यात्रेचे आयोजन केले गेले आहे. त्याठिकाणी मराठवाडा येथून ही मराठा समाजातील बांधव उपस्थित राहणार आहेत. त्याठिकाणी आंदोलनाची भूमिका ठरविण्यात येणार आहे.