संगणकावर इंग्रजी भाषेसाठी स्पेलचेकची सुविधा उपलब्ध आहे, मात्र मराठी भाषेच्या संदर्भात अशी कोणती सुविधा उपलब्ध नाही. ही गरज ओळखून मराठी स्पेलचेकर तयार करण्यासाठी मागील १५ ते २० वर्षांपासून वैयक्तिक व शासन पातळीवर सतत प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना विशेष यश मिळालेले नाही. किंबहुना, अन्य भारतीय भाषांमध्ये देखील याहून स्थिती वेगळी नाही.
या पाश्र्वभूमीवर मागील काही वर्षांपासून केलेल्या प्रयत्नामुळे लेखणी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर या कंपनीला मराठी स्पेलचेकर (अक्षरा प्रणाली) तयार करण्यात यश मिळाले आहे. सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते या प्रणालीचे (सॉफ्टवेअरचे) नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. आता या प्रणालीद्वारे मराठी भाषेतून अचूक टंकलेखन करता येणे आणि लिखित मजकूर तपासता येणे सहज शक्य आहे.
अक्षरा प्रणालीचा (सॉफ्टवेअरचा) मुख्य हेतू मराठी भाषेतील लेखन चुका टाळणे, असा असला तरी सोबत टंकलेखनाशी निगडित अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. उदा. टंकलेखन (टायपिंग) करताना शब्दाखाली समांतर शब्दांच्या सूचना येतील, तयार मजकूर एकाचवेळी तपासता येईल, शब्दसंग्रहात उपलब्ध नसलेला शब्द ॲड टू डिक्शनरी, इग्नोर व ॲड टू ऑटो करेक्ट करता येईल, टंकलिखित शब्दानंतर कोणता शब्द वापरला जाईल याची सूचना मिळेल, मराठी प्रत्येक मूळ शब्दाचा अर्थ मिळेल, टंकलेखनासाठी अठरा प्रकारचे कीबोर्ड उपलब्ध, या प्रणालीसंदर्भात शंका विचारण्यासाठी रिपोर्टचा पर्याय उपलब्ध, सेव्ह इन मायक्रोसॉफ्ट वर्ड, टेक्स्ट, कन्व्हर्ट टू पीडीएफ, कन्व्हर्ट टू इमेज इत्यादी.
सध्या हे सॉफ्टवेअर संगणकावर काम करेल. पुढील काही महिन्यात ही सुविधा API द्वारे मोबाइल, टॅब, ब्राउझर व नेटवर्किंगमध्ये वापरता येईल. आजपासून www.marathispellchecker.com या वेबसाइटवरून ही प्रणाली डाऊनलोड करता येईल व केवळ १ रुपयाच्या मोबदल्यात वापरता येईल. अक्षरा प्रणाली डाऊनलोड करणे, इन्स्टॉल करणे आणि वापरण्याबाबतची सर्व माहिती www.marathispellchecker.com या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधून मिळेल.
सॉफ्टवेअर वापरत असताना काही नवीन सुचवायचे असेल किंवा काही अडचणी असतील, तर सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असलेल्या रिपोर्ट या पर्यायावरून किंवा ०९२८४९७७२११ या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आम्हाला कळवू शकता.
धन्यवाद.
सोबत :
१. अक्षरा सॉफ्टवेअर वापरण्याचे फायदे आणि इतर बाबी
२. लोकार्पण करताना या प्रणालीबद्दल डॉ. गणेश देवी सरांनी दिलेल्या प्रतिक्रिया
अक्षरा सॉफ्टवेअर वापराचे फायदे :
* संगणकावर मराठी भाषा बिनचूक लिहिता येईल.
* ऱ्हस्व – दीर्घ चुका आपोआप दुरुस्त करणे व शब्द टायपिंग करताना पुढील शब्द कोणता असेल हे दाखवण्याचा पर्याय असल्याने कामाची गती वाढेल.
* एकाच वेळी तयार मजकूर तपासता येईल.
* ॲड टू डिक्शनरी व इग्नोर पर्यायाने शब्दसंग्रहात नसलेला शब्द नेहमीसाठी शब्दसंग्रहात साठवता येईल. यामुळे सॉफ्टवेअरचा शब्दसंग्रह नेहमी वाढतच राहील व दिवसेंदिवस कामाची गतीही वाढेल.
* ॲड टू ऑटो करेक्ट या पर्यायाने वापरकर्ता ठरवू शकतो, की कोणता चुकीचा शब्द कोणत्या बरोबर शब्दाने आपोआप दुरुस्त होईल. त्यामुळे काही दिवसांच्या वापरानंतर आपले नेहमी चुकणारे शब्दही आपोआप बरोबर होत राहतील.
* मराठी प्रत्येक मूळ शब्दाचा अर्थ अगदी सहज पाहता येईल. अर्थ उपलब्ध नसेल तर वापरकर्ता शब्द व त्याचा अर्थ समावेश करू शकतो.
* ही प्रणाली १८ कीबोर्ड पुरवते. त्यामुळे टंकलेखनासाठी दुसरे कोणतेही सॉफ्टवेअर घेण्याची गरज नाही.
* सॉफ्टवेअर युनिकोडवर काम करत असल्याने यामधील तपासलेला मजकूर मोबाइल, लॅपटॉप, वेब ब्राउझर व इतर कोणत्याही उपकरणावर वाचू शकाल.
* या प्रणालीमुळे संगणकावरील मराठी टंकलेखन वाढेल.
* परिणामी, भाषेच्या विकास प्रक्रियेत हे सॉफ्टवेअर खारीचा वाटा उचलेल.
इतर बाबी :
* सध्या ही प्रणाली संगणकावर काम करेल व सर्व कामकाज युनिकोडवर चालेल.
* या प्रणालीचा शाळा, विद्यालये, महाविद्यालये, प्रकाशने, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, ग्रामपंचायत ते मंत्रालयासह इतर सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयात वापर होईल.
* शब्द तपासणी शब्दसंग्रह व लेखन नियम या दोन्ही आधारावर होते.
* मराठी शब्दांबरोबर जगातील देश, प्रमुख शहरे, भारतातील राज्ये, त्यांच्या राजधान्या, भारतातील सर्व जिल्हे,
महाराष्ट्रातील सर्व तालुके यांच्या नावांचा यामध्ये समावेश केलेला आहे.
* गावांच्या, व्यक्तींच्या व आडनावांचा यामध्ये समावेश केलेला नाही.
* शब्दसंग्रह दररोज अद्ययावत केला जाईल.
* ही प्रणाली सध्या शब्दांवर काम करते, भविष्यात मराठी वाक्यरचनेवर काम करेल.
मराठी स्पेलचेकर अक्षरा सॉफ्टवेअरबद्दल
डॉ. गणेश देवी सरांची प्रतिक्रिया
सात वर्षापूर्वी युरोपमध्ये स्वीडनच्या एका आयटी लॅबोरेटरीने कोणत्या युरोपियन भाषा जिवंत राहतील व कोणत्या मरून जातील त्याच्या अभ्यास करायचे ठरवले होते. त्यात ७४ भाषांचा अभ्यास केल्यावर असे निदान निघाले, की त्यातील २२ भाषा नाहीशा होतील. त्या लॅबोरेटरीने याचे कारण देताना सांगितले होते की, या भाषा डिजिटल जगात प्रवेश करू शकल्या नाहीत. डिजिटल डेड लँग्वेजेस शोधणे तेव्हापासून चालू झाले. त्यावरून असे पुढे आले की, एखादी भाषा डिजिटल जगात प्रवेश करू शकत नसेल, तर ती भाषा डिजिटली डेड होऊ शकते. त्यामुळे जगातील सात हजार भाषांपैकी सहा हजारापेक्षा जास्त भाषा डिजिटली डेड आहेत. यात भाषा लहान आहे की मोठी आहे हा प्रश्न नाही आहे? यात भाषा डिजिटल जगात नीट प्रवेश करू शकली की नाही हा प्रश्न आहे.
मराठी भाषेचे स्थान जगातील भाषांमध्ये फार उंचावर आहे. जगातील पहिल्या वीस भाषांमध्ये ज्या एक हजारापेक्षा जास्त जुन्या आहेत अशा फक्त पाचच भाषा आहेत, त्यातही मराठीचे स्थान आहे. पण मराठी डिजिटल विश्वामध्ये सक्षमपणे प्रवेश करू शकली नाही, तर ते स्थान कदाचित खाली जाऊ शकते. यासाठी मराठी भाषेला डिजिटल लिखाणामध्ये उपयोगी असणारे सर्व ॲप असणे गरजेचे आहे.
आपण ज्या वेळी कॉम्प्युटरवर इंग्रजीचे टायपिंग करतो, तेव्हा चुकीचे स्पेलिंग दाखविणारा इशारा लगेच येतो. अशी मराठीमध्ये आजपर्यंत ती सोय नव्हती. आता अक्षरा सॉफ्टवेअर माध्यमातून ही सोय निर्माण झाली आहे. हे मराठी भाषेच्या इतिहासातील एक सुवर्णक्षणाने लिहिले गेलेले पान आहे, असे मी समजतो. जर त्याचा वापर मराठी लिहिणाऱ्यांना नीटपणे केला, तर मराठी लेखन सुलभ होऊ शकते, भाषेचा प्रसार चांगला होऊ शकेल आणि जास्तीतजास्त लोकं मराठी व्यवस्थित लिहू शकतील. शाळांमध्ये शुद्धलेखन विषय आता नाहीसा झाला आहे आणि कॉम्प्युटर आल्यानंतर शुद्धलेखन हा विषय असण्याची गरजही नाही आहे. पण शाळेतही शुद्धलेखन शिकवत नसतील आणि कॉम्प्युटरवरही सोय नसेल, तर त्या भाषेची तारांबळ होऊ शकते. म्हणून अक्षराने मराठीला जे योगदान आणलेले आहे, ते फार महत्त्वाचे आहे असे मी मानतो.
अशा प्रकारे भारतीय भाषांमध्ये स्पेलचेक हा आपल्याकडे असलेले माहितीप्रमाणे उपलब्ध नाही आहे. त्यामुळे मराठी भाषेने हे जे योगदान मिळवले, आहे ते त्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. अर्थात, त्यात पहिल्या नंतरची भाषा किंवा दुसऱ्या नंबरची भाषा हा प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की टेक्नॉलॉजी उपलब्ध असताना त्याचा वापर न करणे, हा एक अक्षम्य गुन्हा होऊ शकतो. मराठी भाषेमध्ये असलेली बऱ्याच वर्षांची उणीव आज अक्षरा सॉफ्टवेअरने पूर्ण केलेली आहे. या अक्षरा सॉफ्टवेअरला ज्यांनी घडवलंय, ते माझे तरुण मित्र निवास पाटील हे प्रशंसेला खरोखर पात्र आहेत. त्यांची प्रशंसा किती करावी तितकी कमीच असणार. त्यांना अभिनंदन द्यावं असे वाटतं.
आज दिवाळीच्या दिवशी, नव्या वर्षाच्या दिवशी धारवाडमध्ये येऊन या नव्या मराठी स्पेलचेक सुविधेचे लोकार्पण करण्यात आले आहे, याचा मला फार आनंद होत आहे. हे माझे सद्भाग्य असे समजतो.
– डॉ. गणेश देवी सर