पुणे, १७ ऑक्टोबर: महिलांसाठी उद्योग धोरण विकसित करणार महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य आहे. कोरोना च्या परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र येऊन जी संघटन शक्तीतून काम उभे केले कौतुकास्पद आहे. स्त्रीचे अनेक रूप आपण पाहतो त्यात लक्ष्मीचे रूप म्हणजे व्यवसायीक महिलांच्या ज्ञान व संघटन शक्तीचा उपयोग समाजातील अनेक घटकांना होईल आणि यातून जीतोचे काम अधिक प्रभावित होऊन उत्तम यशोगाथा निर्माण करून जगात जीतोचे नाव व्हाव अशा शुभेच्छा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिल्या.
जीतो पुणे लेडीज विंगच्या वतीने आपल्या जीवनशैलीला आवश्यक असलेल्या वस्तुंचे रुबरु प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आज रविवारी करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जीतो अपेक्सच्या संचालक सुमन बच्छावत, जीतो लेडीज विंगच्या राष्ट्रीय प्रमुख सुनीता बोहरा, प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडसे, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जेएटीएफचे अध्यक्ष इंदर जैन, जीतो अपेक्सचे संचालक इंदर छाजेड व रमेश गांधी, समन्वयक संगीता ललवाणी, जीतो पुणेचे मुख्य सचिव पंकज कर्नावट आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात कपडे, दागिने, भेटवस्तू, गृह सजावटीच्या वस्तू, स्टेशनरी, हँडीक्राफ्ट्स, फूड स्टॉल्स आदी विविध प्रकारातील ८० हून अधिक नामांकित ब्रँड्सचे स्टॉल्स आहेत.
रुबरु प्रदर्शनाच्या निमित्ताने ग्राहकांना खरेदीसाठी ८० हून अधिक प्रकारचे ब्रँड्स एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. यामध्ये लग्न समारंभासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तु व कपड्यांचे ब्रँड्सही उपलब्ध आहेत. जीतो लेडीज विंग च्या वतीने कोरोना महामारीच्या सुरु असलेल्या प्रदीर्घ काळात विविध प्रकारच्या या उत्पादकांसाठी रुबरु प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहकांना देखील या काळात खरेदी करता आलेली नाही आणि त्यामुळेच आपल्या जीवनात लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तुंचा सहभाग असलेले हे प्रदर्शन ग्राहकांनाही उपयुक्त आहे अशी माहिती जीतो लेडीज विंगच्या अध्यक्ष खुशाली चोरडिया यांनी दिली.
लक्झरी लाईफस्टाईलविषयी माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता डॉ जय मदान यांचा टॉक शो होणार आहे. तर, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ रोहिणी पाटील यांचा टॉक शो आणि दुपारी ३ वाजता महिलांची व्यवसायातील भूमिका याविषयी चर्चासत्र होणार आहे, असे जीतो पुणे लेडीज विंगच्या मुख्य सचिव लकिशा मर्लेचा यांनी सांगितले.
रुबरू हे प्रदर्शन पुणे रेल्वे स्टेशनच्या मागे हॉटेल शेरेटॉन याठिकाणी होत असून ते सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत खुले राहणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन दिवाळीच्या मुहुर्तावर खरेदी करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.