‘इनोव्हेट यु टेकाथॉन’ स्पर्धेस देशभरातून स्पर्धकांची नोंदणी
पुणे: इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित ‘इनोव्हेट यु टेकाथॉन’ स्पर्धेस देशभरातील नऊ राज्यांसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. १७ व १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी नऊ राज्यांतून स्पर्धक पुण्यात आपले कौशल्य पणाला लावणार असल्याची माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली. एआयएसएसएमएसच्या आयओआयटी महाविद्यालयात ही स्पर्धा रंगणार आहे.
एआयसीटीई, दिल्ली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मान्यतेने हि स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी सुमारे २५० हुन अधिक स्पर्धकांनी नोंदणी करण्यात केली होती. त्यातील १९० संघांची निवड या स्पर्धेसाठी केली जाणार आहे. भारतातील नऊ राज्यामधील ३९ शहरातील स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १९० संघातील सुमारे ६०० स्पर्धक या स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. अमेरिकेतील टेक्सास शहरातून एक स्पर्धकाने नोंदणी केली आहे. ‘महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हा देखील आमचा हेतू होता. नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह वर्धा, सोलापूर, पंढरपूर, लातूर, नांदेड या ठिकाणांहूनही या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होत असल्याने आमचा एक हेतू साध्य होत असल्याचे मत कल्पेश यादव यांनी व्यक्त केले. पुण्यातीलही अनेक संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यावेळी एआयएसएसएमएसच्या आयओआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने उपस्थित होते.
या स्पर्धेच्या परीक्षणासाठी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तंत्रज्ञान अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नागरी प्रश्नांवर काम करणाऱ्या सरकारी अधिकारीहि या स्पर्धेत परीक्षणासाठी सहभागी होतील. स्पर्धेचे उदघाटन १७ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता होणार असून १८ फेब्रुवारीरोजी सायंकाळी पाच वाजता बक्षीस सभारंभ होईल.
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरी प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशन, पुणे यांनी आयोजित केलेल्या ‘इनोव्हेट यु टेकाथॉन’ या २४ तास सलग चालणाऱ्या हॅकाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एआयएसएसएमएसच्या आयओआयटी यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य असणार आहे. एआयसीटीई, दिल्ली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मान्यतेने हि स्पर्धा होत असून, सुमारे चार लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणार आहेत.
वारे गुरुजींना ‘इनोव्हेशन’ पुरस्कार
या हॅकाथॉन स्पर्धेच्या तंत्रज्ञानाने भारावलेल्या वातावरणाचा अनुभव वाबळेवाडीच्या अटलबिहारी वाजपेयी शाळेचे विद्यार्थी प्रत्यक्ष घेणार आहे. वाबळेवाडीचे सुमारे शंभरहुन अधिक विद्यार्थी या स्पर्धेस उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्याधापक दत्तात्रय वारे यांना ‘इनोव्हेशन’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.