आयटूसीटी’मुळे संशोधन, नवतंत्रज्ञान विकासाला चालना मिळेल* – डॉ. चाणक्य कुमार झा यांच्या पुढाकारातून ‘आयईईई’तर्फे तंत्रज्ञानातील स्थित्यंतरावरील सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Share This News

पुणे : “तंत्रज्ञानातील बदल झपाट्याने होत आहेत. या स्थित्यंतराशी जुळवून घेण्यासाठी सातत्याने संशोधन होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत भेडसावत असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्याचे काम संशोधनातून होईल. त्यामुळे औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थातील भागीदारी अतिशय महत्वाची आहे. या दोन संस्थांच्या सहयोगाने संशोधनाला चालना मिळेल आणि अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होतील,” असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सच्या (आयईईई) एशिया-पॅसिफिक रिजनचे संचालक दीपक माथूर यांनी केले.

‘आयईईई’ बॉम्बे सेक्शन, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी लोणावळा आणि सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंत्रज्ञानातील स्थित्यंतरावरील सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (इंन्टरनॅशनल कॉन्फरन्स फॉर कॉन्व्हरजेंस इन टेकनॉलॉजी-आयटूसीटी) उद्घाटन शुक्रवारी झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल स्वरूपात झालेल्या परिषदेवेळी ‘आयईईई रीजन-१०’चे सदस्य, सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक आणि परिषदेचे प्रमुख डॉ. चाणक्य कुमार झा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) वैज्ञानिक अधिकारी डॉ. बी. सत्यनारायना, ‘आयईईई रीजन-१०’चे संचालक डॉ. लान्स सी फंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य राजेश पांडे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, पुणे अकॅडमी ऑफ ऍडवान्सड स्टडीजचे चेअरमन डॉ. श्रीपाद ढेकणे आदी उपस्थित होते.

‘आयटूसीटी’मुळे संशोधन, नवतंत्रज्ञान विकासाला चालना मिळेल, असे डॉ. चाणक्य कुमार झा यांनी नमूद केले. चार एप्रिलपर्यंत चालणाऱ्या तीन दिवसीय या आंतरराष्ट्रीय परिषदेत ३१ देशांतुन १०५० संशोधन प्रबंध सादर होतील. तसेच जगभरातून ७००० पेक्षा जास्त लोक या परिषदेत सहभागी झाले आहेत. ‘आईईई’ मलेशिया सेक्शनचे चेअर डॉ. फौनिजु आझमदी हुसेन, अमेरिकेतील टेलनेट मॅनेजमेंट कन्सल्टिंगचे डॉ. फावजी बेहमन, भारत सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागातील इंटरनॅशनल बायलॅटरल कोऑपरेशन डिव्हिजनचे प्रमुख संजीव कुमार मार्गदर्शन करणार आहेत. तसेच १००० हुन अधिक संशोधन प्रबंध सादर होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दीपक माथूर म्हणाले, “संशोधनाविषयी अधिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम घेतले गेले पाहिजेत. शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन स्थानिक उद्योगांमधील तज्ज्ञांच्या सहयोगाने संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे. कोरोनासंदर्भात उपाययोजना व संशोधन करण्यासाठी ‘आयईईई’मधील संसाधनाचा उपयोग विद्यार्थ्यांना, संशोधकांना करता येईल. या परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळेल. त्यातून अनेक सर्जनशील उपक्रम राबविण्यास मदत होईल.”

डॉ. चाणक्य कुमार झा यांनी परिषदेची रूपरेषा मांडली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दरवर्षीप्रमाणे ही परिषद प्रत्यक्षात घेता आली नाही. मात्र, या परिषदेत होणारे विचारमंथन विद्यार्थी व सर्वच सहभागीसाठी उपयुक्त ठरेल. नवतंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा गोष्टींचा उहापोह या परिषदेत करण्यात आल्याचे झा यांनी नमूद केले. डॉ. लान्स सी फंग, डॉ. श्रीपाद ढेकणे यांनीही मनोगते मांडली.

डॉ. बी. सत्यनारायना यांनी ‘फ्युचर रिसर्च डायरेक्शन अँड न्यू अप्लिकेशन एरियाज ऑफ व्हीएलएसआय इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयावर सादरीकरण केले. पदवी अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या डिझाईनच्या मदतीने सोप्या शब्दात त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त कुठल्या भाषा, तंत्रज्ञान शिकावे, याचेही मार्गदर्शन केले. रश्मी यादव यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.