पुणे : कोरोना संसर्गामुळे पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. देशात अश्वसफारीचे एकमेव ठिकाण असलेल्या माथेरानमधील अश्वामालक अडचणीत सापडले आहेत. पर्यटन बंद असल्याने अश्व, तसेच त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना पुण्यातील फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून मदतीचा हात देण्यात आला. सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत रविवारी येथील ४६० कुटुंबांना महिनाभराचे अश्वखाद्य व अन्नधान्याचे किट देण्यात आले.
माथेरान हे पर्यटनावर अवलंबून असलेले ठिकाण आहे. अश्वसफारी हेच येथील उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून येथील पर्यटन व्यवसाय बंद आहे. त्यामुळे या लोकांवर हलाखीचे दिवस आले आहेत. अश्वांना जागविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. माथेरान येथील मूळवासी अश्वपाल संघटनेने मुकुल माधव फाउंडेशनकडे मदतीची विनंती केली. त्याला तात्काळ प्रतिसाद देत फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून अश्वखाद्य व अन्नधान्याचे दोन ट्रक पाठविण्यात आले. मुकुल माधव फाउंडेशनकडून झालेल्या या मदतीबद्दल मूळवासी अश्वपाल संघटनेने कृतज्ञता व्यक्त केली.
अश्वपाल बांधवांना फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात देऊ शकलो. त्यांच्या अश्वांना व कुटुंबियांना महिनाभराचे अन्नदान आमच्या हातून झाले, याचा आनंद वाटतो. भविष्यातही फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक गरजूंना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.