पुणे : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या काळात संस्कृतच्या अभ्यासाकडे आपले दुर्लक्ष झाले आणि त्याचे केंद्र भारताबाहेर अमेरिकेसारख्या देशात झाले. त्यामुळे संस्कृतचे विकृत अर्थ आपल्याला आणि जगाला देखील ते सांगत आहेत. संस्कृतचा वारसा, त्यावरचा ताबा पुन्हा मिळवायला पाहिजे. संस्कृत हा केवळ भारताचा नाही तर जगाचा वारसा आहे. ती जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे. संस्कृतचा अभ्यास सुरू केला तर संस्कृतला नवा आकार येईल, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. सोहळ्यांतर्गत सृजन युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार लोकप्रिय युवा कवी संदीप खरे आणि चितळे बंधू मिठाईवालेचे इंद्रनील चितळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, श्रीकांत जोशी, अजय कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, अभिजित देशपांडे, मंदार महाजन, निकिता संत, मिलिंद दारव्हेकर, मंजुषा वैद्य आदी उपस्थित होते.
युवा उपक्रमांतर्गत सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार आणि स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुषपगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी संदीप खरे व इंद्रनील चितळे यांच्या यशस्वी प्रवासाबद्दलची मुलाखत घेण्यात आली.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, शिक्षणाच्या केंद्रात तपश्चर्या करायची असते ही भावना आताच्या रूढ शिक्षणपद्धतीत राहिली आहे का याचा विचार करायला पाहिजे. संस्कृतचा अभ्यास, वेदविद्येला पुन्हा चालना आणि ती करताना उद्योजक विकास या दिशेने वाटचाल झाली तर आपलाच नाही तर भारताचा आणि जगाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ब्राह्मण समाजातील सर्वांनी एकमेकांना आधार आणि प्रोत्साहन द्या. देश म्हणून एकत्र येत संघटित व्हा. आर्थिक गोष्टीसाठी एकत्र येणे ही एक बाब झाली, परंतु आपल्या अस्मितेसाठी देखील एकत्र या. ब्राह्मण समाज हा कर्तृत्वान लोकांची परंपरा असलेला समाज आहे, असेही त्यांना सांगितले.
इंद्रनील चितळे म्हणाले, व्यावसायिकाच्या संघर्षाच्या काळात तो एकटा असतो. त्यामुळे असे पुरस्कार मिळणे हे त्याच्यासाठी प्रोत्साहन असते.
संदीप खरे म्हणाले, कोणताही कलाकार निर्मितीच्या प्रवासात एकटाच असतो. या प्रवासातील त्याच्या कथा-व्यथा त्या कलाकाराला एकटे करून सोडतात. अशावेळी मिळणारे पुरस्कार हे विश्रांती, सावली देणाऱ्या झाडासारखे असतात.
मंदार महाजन यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत देशपांडे यांनी आभार मानले.
फोटो ओळ – शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त सृजन युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पुरस्कारार्थी आणि मान्यवर.