शिक्षण प्रसारक मंडळीकडून रक्तदान शिबीर संपन्न

Share This News

शिक्षण प्रसारक मंडळीकडून रक्तदान शिबीर संपन्न
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या करोना महामारीच्या भीषण आपत्तीच्या काळात करोना व अन्य रोगांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना रक्ताचा भीषण तुटवडा जाणवत आहे. अशा प्रसंगी आपली सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय कर्तव्य ओळखून शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या वतीने शनिवार दि. 24 एप्रिल, 2021 रोजी मुंबई, पुणे व सोलापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले होते.
पुणे येथे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या या रक्तदान शिबीरासाठी अभिनेते राहूल सोलापूरकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री गायत्री दातार, अभिनेते अजय पुरकर, फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर व आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहन मोरे या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरासाठी सुमारे 415 रक्तदात्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी सुमारे 120 रक्तदात्यांना हिमोग्लोबिन कमी असणे किंवा टॅटू काढल्यामुळे रक्तदान करता आले नाही.
सकाळी 9 वाजता या रक्तदान शिबीरास सुरूवात झाली. उद्घाटन प्रसंगी शि. प्र. मंडळीचे नियामक मंडळ सदस्य मा. मिहिर प्रभुदेसाई यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात सांगितले की 1 मे पासून अठरा व त्यापुढील सर्व लोकांना लसीकरण उपलब्ध होणार आहे आणि लसीकरण झाल्यानंतर सुमारे तीन महीने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे येणा-या काळात रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्याची तजवीज आतापासूनच करणे गरजेचे आहे. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सविता दातार यांनी सांगितले की शि. प्र. मंडळी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रभागी असते. आजचा कार्यक्रम सुद्धा याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग आहे.
या शिबीरासाठी शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष अॅड. नंदू फडके, नियामक मंडळ अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, तसेच शि.प्र. मंडळी नियामक मंडळाचे सदस्य अॅड. मिहिर प्रभुदेसाई, श्री. सतीश पवार, श्री. जयंत किराड,श्री. पराग ठाकूर, श्री.केशव वझे, श्री. सुधीर काळकर, अॅड. दामोदर भंडारी, श्री. राजेंद्र पटवर्धन, स. प. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सविता दातार, नू.म.वि. शाळेच्या प्राचार्य श्रीमती प्राची गुमास्ते व एस.पी.एम. शाळेच्या मुख्याध्यापक डॉ. अपर्णा मॉरिस मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या रक्तदान शिबीरात शि. प्र. मंडळीच्या नू.म.वि., एस.पी.एम. पब्लिक स्कूल, स. प. महाविद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहभाग घेतला. या रक्तदान शिबीराच्या आयोजनात स.प. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांनी स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्त भाग घेतला. कोरोना काळातील प्रतिबंध व नियम पाळून या शिबीराचे आयोजन केले. स. प. महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा. रणजीत चामले, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. धुळगंडे, प्रा. भौराळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. सुशील ठिगळे तसेच प्रा. अभिजित चव्हाण, प्रा. राजाभाऊ ढोण, प्रा. दीपराज सांखला, प्रा. हनुमंत ठोंबरे, श्री नितीन राख यांनी विशेष परिश्रम घेतले.

(सुजित मंगलोरकर)
मुख्य कार्यकारी अधिकारी,
शिक्षण प्रसारक मंडळी