देशाच्या नावलौकिकात भर घालण्यात खेळाडुंचे नेहमीच महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे कोथरुड मध्ये खेळाडुंना सर्वप्रकारच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यावर नेहमीच भर असतो. रोलबॉलसारख्या क्रीडा प्रकारांचा विकास आणि खेळाडुंना सरावासाठी स्वतंत्र मैदान उभारण्यासाठी आमदार निधीतून तरतूद करणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
रोल बॉल खेळाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त सन २०२० आणि २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंजुश्रीताई खर्डेकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक आणि आंतरराष्ट्रीय रोल बॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे, अध्यक्ष सूर्यकांत काकडे, ऑल इंडिया रोल बॉल फेडरेशनचे सचिव श्री.चेतन भांडवलकर, रोल बॉल संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. गजानन थरकुडे, सचिव श्री. प्रमोद काळे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, “देशाच्या नावलौकिकात भर घालण्यात खेळाडुंचे नेहमीच महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे कोथरुड मध्ये खेळाडुंना सर्वप्रकारच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यावर नेहमीच भर असतो. माननीय देवेंद्रजींच्या कार्यकाळात राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर सर्वाधिक भर देण्यात आला. तसेच मी स्वतः देखील क्रीडाप्रेमी असल्याने अनेक खेळाडुंना लोकसहभागातून मदत करत असतो. त्यामुळे रोलबॉलसारख्या क्रीडा प्रकारांचा विकास होणे गरजेचे आहे. या खेळाडुंना सरावासाठी अद्ययावत आणि सुसज्ज मैदानाची गरज आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून देऊ.” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की, “माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खेळाडूंना कोणत्याही प्रकारची कमतरता कधीही पडू दिली जात नाही. रोल बॉल साठी यापूर्वीच शाळांचे मैदान उपलब्ध करून दिले होते. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे मैदान वापरावर क्षेत्रातील आली. आता निर्बंध शिथिल झाल्यास, मैदान वापरता येईल.”
दरम्यान, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांची विशेष सत्कार आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.