मुंबई दि. 17: पंडित द.वि.काणेबुवा प्रतिष्ठानने काही दिवसांपूर्वी 100 कलाकारांना घेऊन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पुण्यात शास्त्रीय कार्यक्रम सादर केला. राज्य शासनामार्फतही भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्ष साजरे करीत असताना महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानमार्फत राज्य शासनाबरोबर संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम कसे आयोजित करता येतील याबाबतची बैठक आज विधानपरिषद ऊपसभापतीं ना.नीलमताई गोर्हे यांच्या दालनात मा.ऊपसभापती ना.नीलम गोर्हेंनी बैठक बोलावुन ना.अमित देशमुख यांना पाचारण केले होते.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमख उपस्थितीत आज भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पंडित द.व.काणेबुवा प्रतिष्ठानचे गोविंद बेडेकर, गायिका मंजुषा पाटील, डॉ.विनिता आपटे, डॉ. भरत बळवल्ली यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पंडित द. वि.काणेबुवा प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत काही दिवसांपूर्वी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘खयाल यज्ञ’ हा शास्त्रीय सांगितिक कार्यक्रम पुण्यात 100 हून अधिक कलाकारांना घेऊन सादर केला. याच धर्तीवर राज्य शासनाबरोबर संयुक्त विद्यमाने कशा पध्दतीने कार्यक्रम आयोजित करता येतील याबाबतचा त्वरित प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागास त्वरित द्यावा. सध्या राज्यातील कोविड आणि एकूण परिस्थिती पाहून तसेच या प्रस्तावाबाबतचा अभ्यास सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येईल. विशेष म्हणजे या प्रस्तावामध्ये समाजमाध्यमांवरुन या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग कसे करण्यात येईल याबाबतचेही नियोजन देण्यात यावे जेणेकरुन या सांगितिक कार्यक्रमांचा अनुभव सगळयांनाच घेता येईल,व शासनाने या कार्यक्रमासाठी २कोटीचा निधी ऊपलब्ध करुन द्यावा असे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी निर्देश दिले. पंडित जोशींच्या जन्मशताब्दी वर्षांच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शासनाने हा दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
*भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्ताने शासनाच्या सहकार्याने*
*महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार — अमित देशमुख*
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 4 फेब्रुवारी 2021 रोजीपासून सुरुवात झाली असून वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पंडितजींच्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कार्याचा गौरव जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाच्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि त्यांच्या जन्मस्थळी अशा ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय गायन, वादन व नृत्य अविष्कार, किराणा घराणा परंपरा गायन, शास्त्रीय गायन, वादन व नृत्य जुगलबंदी, राज्यातील १० अकृषिक विद्यापीठातील युवा गायक, वादक, नृत्य कलाकारांचा कार्यक्रम,अभंगवाणी अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे असे श्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.