पुणे : इतिहासाची ओळख नव्याने करून देण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्राशी, मराठी मनाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला मराठी रंगभूमीचा माहितीपूर्ण इतिहास सांगणार्या ‘स्वरनाट्य रसगंगा’ या पुस्तकाचा उपयोग होईल, पुस्तकरूपाने निर्माण करण्यात आलेली सांस्कृतिक पुंजी नव्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी व्यक्त केला. न्याय मिळविताना मराठी माणसाची भूमिका विरक्त असावी पण संन्यस्त नसावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मराठीतील हौशी-प्रायोगिक रंगभूमीची नाट्यपंढरी असलेल्या आणि 127 वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे 150 वर्षांतील मराठी रंगभूमीचा माहितीपूर्ण रंजक इतिहास ‘स्वरनाट्य रसगंगा’ या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. निलम गोर्हे यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे तसेच पुस्तकाच्या लेखिका अर्चना साने, यशश्री पुणेकर, पुस्तकाचे संपादक गोपाळ अवटी, डॉ. मेधा कुलकर्णी, भरत नाट्य संशोधन मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे, अध्यक्ष आनंद पानसे, कार्याध्यक्ष अभय जबडे यांची रंगमंचावर उपस्थिती होती.
सामाजिक आशय दर्शविणार्या संगीत एकच प्याला, संगीत शारदा या नाटकांनी समाजप्रबोधन केले. साहित्य, कला, संस्कृतीचे पुण्याने जतन केले असून ऐतिहासिक संस्था म्हणून भरत नाट्य संशोधन मंदिराचा गौरवाने उल्लेख करावा लागेल, असे सांगून डॉ. गोर्हे म्हणाल्या, मराठी नाटक, संगीत नाटक हा मराठी मनाचा अविभाज्य भाग आहे. नाटकातील अभिनय वेगळा आणि राजकारण वेगळे, राजकारणी लोकांना अभिनय ओळखता येणे गरजेचे असते. कोण खरे, कोण खोटे हे समजणे गरजेचे असते अशी टिप्पणीही त्यांनी केली.
नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनातून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना हद्दपार करण्यात आले आहे, या विषयी टिप्पणी करताना शरद पोंक्षे यांनी, ज्या देशाचे साहित्य, संस्कृती दुबळी होते ते राष्ट्र विस्मृतीत जायला वेळ लागत नाही या सावरकर यांच्या विधानाची आठवण करून दिली. इतिहास हा नेहमीच अपूर्ण असतो, तो कधीच पूर्ण होऊ शकत नाही. इतिहासाचे संशोधन सतत चालूच राहते. मराठी रंगभूमीचा इतिहास जतन करण्यासाठी सांस्कृतिक दालन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे, त्या करिता या पुस्तकाचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच दिडशे वर्षांची मराठी रंगभूमी काय होती, कशी आहे, हे परदेशातील अभ्यासकांनाही उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. या प्रस्तावित दालनासाठी डॉ. गोर्हे यांनी 51 हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा या वेळी केली.
अभ्यासकांसाठी ‘स्वरनाट्य रसगंगा’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास पुस्तकाचे संपादक गोपाळ अवटी यांनी व्यक्त केला. लेखिका अर्चना साने, यशश्री पुणेकर यांनी पुस्तक कशा पद्धतीने साकारले गेले याविषयी मनोगत व्यक्त केले.
‘स्वरनाट्य रसगंगा’ या पुस्तकाच्या रूपाने चांगले संकलित भांडार वाचकांना उपलब्ध होईल, असे मत डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
भरत नाट्य संशोधन मंदिराच्या उपक्रमांविषयी अध्यक्ष आनंद पानसे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ अभिनेते आणि भरत नाट्य संशोधन मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे यांनी लिहिली आहे. उपस्थितांचे स्वागत आनंद पानसे, रवींद्र खरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले. विविध भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आभार रवींद्र खरे यांनी मानले. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे उपस्थित होते. दीपक दंडवते, संजय डोळे, विश्वास पांगारकर, राम धावारे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.