पुणे : मोठ्या कष्टाने आयुष्यभर साकारलेली कलाकृती जळून खाक झाली. आजवर साकारलेल्या अनेक शिल्पे, मूर्ती, साचे, मोल्ड यासह सगळे काही जळाले. या घटनेने माझी कलेची तपश्चर्या भस्मसात झाली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात ओढवलेल्या या संकटामुळे सगळेच हरवून बसलो आहे. पण पुन्हा जिद्दीने उभा राहायचे आहे, त्यात आपली मोलाची साथ हवी आहे,” अशी भावना प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार विनोद येलारपूरकर यांनी व्यक्त केली.
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास येलारपूरकर यांचा सिंहगड पायथ्याला गोरे खुर्द येथे नव्याने उभारलेला स्टुडिओ आगीत जळून खाक झाला. शिल्पकलेतून साकारलेली अनेक शिल्पे, देखावे आणि साचे (डाय), मोल्ड यासह अनेक मौल्यवान वस्तू या आगीत जळाल्या. कोरोनामुळे आधीच कलाकारांवर संकट असताना अनपेक्षित घडलेल्या या दुर्घटनेमुळे विनोद येलारपूरकर यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधाराची गरज आहे. याच संदर्भात शिल्पकार येलारपूरकर पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांना धीर देण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या असून, या संस्थांचे प्रतिनिधी शिल्पकार विवेक खटावकर, आनंद सराफ, शिरीष मोहिते, सुभाष जिरगे, प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते. जेजे स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्या माध्यमातून आर्ट लाईन ग्रुपतर्फे एक लाखाची, तर शिरीष मोहिते यांनी सेवा मित्र मंडळातर्फे ११ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
विनोद येलारपूरकर म्हणाले, “गेल्या दोन महिन्यांपासून या जागेत स्टुडिओ उभारण्याचे काम सुरु होते. पुढील दोन-तीन दिवसात स्टुडिओचे पूजन करून तेथून काम सुरु होणार होते. त्यामुळे सर्व शिल्पे, मोल्ड व अन्य साहित्य तेथे हलवले होते. काल अचानक लागलेल्या आगीत हे साहित्य जळाले. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ५०-६० शिल्पे, देखाव्यांसाठी लागणाऱ्या मुर्ती, महापुरुषांचे पुतळे, इतर फायबरचे साहित्य जळाले. सात-आठ लाख रुपये खर्चून हा स्टुडिओ उभारला होता. २५-३० लाखाचे इतर साहित्य होते. असे सगळे मिळून जवळपास ३५-४० लाखांचे नुकसान झाले आहे.”
शहरातील सर्व गणेश मंडळे, कलाकार येलारपूरकर यांच्या पाठीशी उभे राहतील, असे आनंद सराफ व विवेक खटावकर यांनी सांगितले. विविध सामाजिक संस्था, कलेला प्रोत्साहान देणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून मदतनिधी उभारून येलारपूरकर यांना आधार देऊ, असे आश्वासन शिरीष मोहिते व प्रसाद खंडागळे यांनी दिले. जेजुरी संस्थान व अन्य देवस्थानांशी याबाबतीत संपर्क करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वीट, सिमेंट, पत्रे व स्टुडिओच्या उभारणीसाठी लागणारे अन्य साहित्यरूपी मदत करण्याचे आवाहन सुभाष जिरगे यांनी केले.
विनोद येलारपूरकर यांचे कार्य
जेजे स्कुल ऑफ आर्ट संस्थेतून शिक्षण घेतलेल्या शिल्पकार विनोद येलारपूरकर यांनी गेल्या ३० वर्षात पुण्यातील गणेशोत्सवात देखावे, शिल्पे साकारण्याचे काम केले आहे. शहराच्या अनेक भागात त्यांनी विविध शिल्पे उभारली आहेत. त्यामध्ये ओंकारेश्वर चौकातील वारकऱ्यांचे शिल्प, नाना पेठेतील वारीचे शिल्प, संत कबीर चौकातील त्रिमितीय शिल्प, डुल्या मारुती चौक व सेव्हन लव्ह्ज चौकातील ‘मुलगी वाचवा’चे शिल्प, पासोड्या-निवडुंगा विठोबा मंदिराच्या कमानी, म्युरल्स आदी गोष्टी त्यांनी साकारल्या आहेत.
येलारपूरकर यांना मदत करण्यासाठी
कलाकृती ही कलाकाराचा आत्मा असतो. तीच कलाकृती आगीत भस्मसात झाल्याने येलारपूरकर यांच्यावर मोठा आघात झाला आहे. त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे. ज्यांना येलारपूरकर यांना अर्थसहाय्य किंवा वस्तुरूप मदत करायची असेल, त्यांनी विनोद येलारपूरकर (९८२२९२४४२२) यांच्याशी संपर्क करावा. खात्याचे नाव : विद्या आर्टस्, खाते क्रमांक : ०५३०२११०००००२९३, आयएफएससी कोड : ABHY००६५११०, बँकेचे नाव : अभ्युदय को-ऑप. बँक, सिंहगड रस्ता, पुणे यावर अर्थसहाय्य करावे.