रोटरी क्लब शिवाजीनगरच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा.

Share This News

पुणे (दि.२६) रोटरी क्लब शिवाजीनगर आणि मॉडर्न महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना सैनिकांच्या त्यागाची, परिश्रमांची जाणीव व्हावी, तसेच सैन्यामध्ये प्रवेश घेवू इच्छीणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर व ग्रुप कॅप्टन नितीन वेल्डे (एअरफोर्स वेटरन) उपस्थित होते. सुरुवातीला रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्ष डॉ.भारती डोळे यांनी प्रास्तविक केले. भारतीय सैन्याच्या प्रति त्यांनी आदर व अभिमान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक होवून त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देवू नये असे आवाहन केले. प्राचार्य डॉ.झुंजारराव यांनी उपस्थितांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा लाभ करून घ्यावा असे सांगितले. ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर यांनी सैन्यामध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश परीक्षा, मुलाखतीचे तंत्र याविषयी मार्गदर्शन केले. ग्रुप कॅप्टन नितीन वेल्डे यांनी कारगिल युद्धातील प्रत्यक्ष अनुभवाचे दृक श्राव्य सादरीकरण केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये युद्ध करणाऱ्या आपल्या सैनिकांची कामगिरी बघून सर्वांच्या अंगावर काटा आला. कार्यक्रमाच्या शेवटी विशेष नेतृत्व दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला नॅशनल कॅडेट कॉर्पसचे विद्यार्थी रोटरी क्लब शिवाजीनगरचे सचिव सचिन जोगळेकर व इतर सदस्य, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
छायाचित्र : मान्यवर व विद्यार्थी यांचे समूहचित्र.