पुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष आहे. यामध्ये चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर,पत्रकार, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यंदा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे या पुरस्काराच्या माध्यमातून जमा होणारा निधी सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे, अशी माहिती कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे ‘पॅड मॅन’ योगेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला ‘पॅड मॅन’ योगेश पवार यांच्यासह दीपाली कांबळे, विजय दगडे, झाहिरा शेख, डॉ.स्मिता बारवकर आणि अभिनेत्री पूजा वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना योगेश पवार म्हणाले,आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयीचे विविध उपक्रम राबवित असतो. या शो मधून जमा होणारा निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराच्या निमित्ताने जमा होणाऱ्या निधी मधून दुर्गम भागातील महिलांना सॅनेटरी नॅप्किन्स चे वाटप केले जाणार आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी आमच्या मान्यवर निवड समितीने ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, अभिनेते अभिजीत चव्हाण, युवा अभिनेता अमित भानुशाली, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, अभिनेत्री सायली देवधर, अभिनेते सौरभ चौगुले, पत्रकारिता क्षेत्रातील अरुण देविदास मेहेत्रे ( विशेष वरिष्ठ प्रतिनिधी, झी 24 तास), अरुण रमेश सुर्वे (मुख्य उपसंपादक, सकाळ), विजय कुलकर्णी (उपसंपादक, राष्ट्रसंचार), आरजे निमी, आरजे सौरभ यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा येत्या ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे सायंकाळी ७ वा. होणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.
चौकट
*सीमेवर लढताना अपंगत्व आलेल्या लष्करी जवान राजाराम वाणी यांचा होणार विशेष सन्मान*
पुण्यातील हडपसर येथील रहिवासी असलेले भारतीय लष्करातील जवान राजाराम वाणी यांना भारत – पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आले त्यांचा ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्कार सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. राजाराम वाणी हे भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत होते, २०१२ साली पुंछ जिल्ह्यात मेंधर येथे कर्तव्य बजावत. देशाचे संरक्षण करत असताना १२ डिसेंबर २०१२ रोजी एका भुसुरुंगांच्या स्फोटात त्यांना आपला पाय गमवावा लागला. त्यानंतर त्यांनी २०१९ पर्यंत लष्करातच अन्य विभागात सेवा बजावली आहे. त्यांच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी कशिश सोशल फाउंडेशन त्यांचा हा विशेष सन्मान करणार आहे.