‘स्पोकन मराठी अकादमी’तर्फे कवितेचे वर्ग सुरू.

Share This News

महाराष्ट्र कॉस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटी,पुणे (एम.सी.ई सोसायटी पुणे) नेहमीच नवनवे उपक्रम राबवित असते आणि महाराष्ट्र, खास करून पुण्यात त्याला चांगलाच प्रतिसाद मिळतो. असाच नवा उपक्रम आम्ही सुरु करीत आहोत. एखाद्या एखाद्या शिक्षण संस्थेने असा उपक्रम राबविणे हे भारतात नव्हे तर जगात प्रथमच घडत आहे.
‘स्पोकन मराठी अकादमी’तर्फे आम्ही कवितेचे वर्ग सुरू करीत आहोत. मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य ज्यात दडले आहे, अशा ‘कविता’ या साहित्यप्रकाराबाबत आजकाल जाणविणारी उदासिनता दूर करण्याच्या दृष्टीने हे पाऊल आम्ही उचलले आहे. धर्म-जात या पलिकडे पहायला शिकविणारे साहित्य व त्याचे उपप्रकार विद्यार्थ्यांना योग्य वयात समजले तर ते विद्यार्थी अधिक चांगल्या तर्‍हेने जबाबदार व्यक्ती म्हणून जगतील व इतरांना जगवतील. जगात संगीताचे,नृत्याचे व क्रीडा प्रकाराचे वर्ग (क्लासेस) आहेत. मात्र कवितेचे वर्ग नाहीत. ज्या मुलांना त्यात रस असतो त्यांनी कुठे शिकावे? असा आपल्यालाही प्रश्‍न पडला असेल. ती अडचण ओळखून हे वर्ग घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

‘लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, असे मराठी भाषेचे गौरवगीत लिहिणारे कविश्रेष्ठ सुरेश भट यांचे शिष्य व मराठीतील सुप्रसिध्द कवी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रदीप निफाडकर हे ह्या वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा कवितेचा अभ्यास आणि त्यांची तळमळ आपल्या सर्वांना विदीतच आहे. ह्या वर्गासाठी अकादमीच्या हवेशीर व प्रसन्न खोल्या उपलब्ध केल्या आहेत. हा वर्ग दर शनिवारी सायंकाळी चार ते सहा व रविवारी सकाळी आठ ते दहा अशा वेळेत करण्याचा मानस आहे. सहा महिन्यानंतर विद्यार्थ्याची एक परीक्षा घेतली जाईल. त्यातील विजेत्यांना भरघोस बक्षिसे व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाईल.

पाचवीनंतरच्या वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यांला या वर्गात प्रवेश मिळेल. या वर्गाला वयाची अट नसल्याने मराठी भाषेच्या शिक्षकांनाही ह्या वर्गात विद्यार्थी म्हणून येता येईल. अकादमीच्या संचालिका नूरजहाँ अ. शेख ( संपर्क क्रमांक ७९७२९२९३७१) यांच्याकडे या वर्गाची संपूर्ण जबाबदारी आहे. ज्यांना या वर्गात प्रवेश हवा आहे, त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.

धन्यवाद.

आपला नम्र,

डाॅ. पी.ए.इनामदार , अध्यक्ष,एम.सी.ई. सोसायटी, पुणे

पत्रकार परिषदेला उपस्थितांची नावे व त्यांचे हुद्दे आपल्या माहितीसाठी –

श्री पी.ए.इनामदार , अध्यक्ष,एम.सी.ई. सोसायटी, पुणे
सौ आबेदा इनामदार , उपाध्यक्षा,एम.सी.ई. सोसायटी, पुणे
श्री. प्रदीप निफाडकर , सुप्रसिद्ध मराठी गझलकार व ज्येष्ठ पत्रकार
सौ. नूरजहाँ अ. शेख , संचालिका, एम.सी.ई. सोसायटीची ‘स्पोकन मराठी अकादमी’ ,आझम कॅम्पस पुणे