पुणे | २७ व्या आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचे आयोजन पुण्यातील ‘द कोरियंथन्स रिसॉर्ट अँड क्लब’ येथे करण्यात आले आहे. हे संमेलन ४ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर असे तीन दिवस असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात ५ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीदेखील उपस्थिती असेल, अशी माहिती सुहिंना सिंधी-पुणेचे अध्यक्ष डॉ. पितांबर (पीटर) धलवाणी यांनी दिली.
पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत धलवाणी बोलत होते. यावेळी अलायन्स ऑफ ग्लोबल सिंधी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तुक शाह, मनोहर फेरवाणी, सुरेश रुपीजा, मोती मिलाणी, रमेश छाब्रिया, राजीव कृषनानी, सुनील दर्यानानी उपस्थित होते. डॉ. धलवाणी म्हणाले, ‘सिंधी संमेलनात विविध कार्यक्रम होणार असून, यामध्ये महेश चंदर आणि पिंकी मैदासानी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, झुलेलाल कीर्तन, साधू वासवानी मिशनच्या दीदी कृष्णा यांचे प्रवचन यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सिंधी समाजाला मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय जगप्रसिद्ध प्रेम भाटियाजी यांच्या कलाविष्काराने सिंधी सांस्कृतिक छेज नृत्य होणार आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमात मिस इंडिया २०१३ मिस सिम्रन, भारताचे बुकिनो फासो येथील मानद राजदूत दीपक रामचंदाणी, भारताचे कांगो येथील मानद राजदूत, रमन दासनानी, भारताचे गिनी बिसाऊ येथील मानद राजदूत मोहन दुदाणी, भारताच्या द रिपब्लिक ऑफ स्लोवॅनिया युगांडा येथील मानद राजदूत, मीरा वदोदारिया तसेच भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सम्मानाचे मानकरी हिरो शिवदासानी (अबीजान) यांच्यासह अनेकांची उपस्थिती असणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.