मुंबई/पुणे दि.०३ : काळाची पाऊले ओळखत हवामानबदलाचे दुष्परिणाम कमी करत पर्यावरण संवर्धन साधत असताना शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या दृष्टीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने, मुंबई स्थित संपर्क संस्था आणि स्त्री आधार केंद्र, पुणे यांनी ८ व ९ फेब्रुवारी, २०२२ रोजी राज्यस्तरीय दृक्श्राव्य माध्यमाद्वारे मंथन परिषद आयोजित केली आहे. या परिषदेतून राज्यस्तरीय कृती आराखड्याची निश्चिती होणार आहे.
ही परिषद ८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान झूम या ऑनलाईन मंचावर पार पडेल. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून डॉ.नीलम गोऱ्हे ह्या सदरील परिषदेच्या अध्यक्ष असणार आहेत. आशिआ व जागतिक स्वयंसेवी संस्था विकास तज्ञ अजय झा, नवी दिल्ली, राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, अभिजीत धोरपडे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
यासह राज्यात हवामानबद्दल, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करणाऱ्या संस्था व तज्ज्ञ , प्रियदर्शिनी कर्वे, शुभदा देशमुख, शिरीष फडतरे, दिलीप गोडे, रमेश भिसे, संस्कृती मेनन, अपर्णा पाठक आणि विभावरी कांबळे, या परिषदेत विचार मांडणार आहेत. तज्ज्ञांच्या समन्वयातून व विचार मंथनातून हवामानबदल दुष्परिणाम रोखण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
———
शासनाच्या प्रयत्नांना बळ
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कल्पकतेतून राज्य शासन ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेत पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक, कृतीयुक्त उपक्रम राबवत आहे. राज्यस्तरीय कृती आराखडा निर्माण करत या अभियानाला, पर्यायाने राज्याच्या पर्यावरणविषयक उपक्रमांना आणखी बळ देण्यासाठी मंथन परिषद उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध संस्था, तज्ज्ञ मान्यवर यांच्या कार्याचे व अनुभवाचे पाठबळदेखील लाभणार आहे.
सदरपरिषदेचे लाइव्ह प्रक्षेपण ‘नवी उमेद’ व स्त्री आधार केंद्राच्या @streeaadharkendra या फेसबुक पेजवरून होईल. तसेच, पेजवरून केलेल्या पृच्छांची सुयोग्य दखल घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला जाईल.
अधिक माहितीसाठी संयोजकांना संपर्क उपसभापती, विधानपरिषद कार्यालय (योगेश जाधव (९०२८३३३३०५/०६) उमेदच्या मृणालिनी जोग (९८२०५०४७८१) स्री आधार केंद्र (streeaadharkarndra @gmail.com )