एकात्मिक रस्ते विकास योजने अंतर्गत शिवणे ते खराडी हा 18 कि.मी लांबीच्या रस्त्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पाची 2011 साली आखणी करण्यात आली.मात्र दशकपूर्ती होत असताना सदर काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून यासाठी प्रशासकीय अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केला आहे.मी गत पाच वर्षे विविध स्तरावर पाठपुरावा करत असतानाही अद्याप हे काम रखडलेलेच असून भू संपादन न झाल्याने ही अवस्था आहे. मुळात दहा वर्षांपूर्वी ह्या रस्त्याची आखणी करताना म्हात्रे पुलाखालून नदीपात्रातील रस्त्यावरून संचेती रुग्णालया वरून, इंजिनियरिंग कॉलेज मार्गे संगमवाडी ते बिंदूमाधव ठाकरे चौक ते खराडी अशी ह्या रस्त्याची आखणी होती. ही रचना करताना ना भविष्याचा विचार केला गेला ना भू संपादनाचा आणि त्यामुळेच शिवणे ते खराडी हे अंतर वाहतुकीसाठी सुलभ होण्याचे स्वप्न भंगले असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. सद्यस्थितीत रस्ता कर्वेनगर मध्ये महालक्ष्मी लॉन्स जवळ येऊन थांबला आहे तर राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यान जागा ताब्यात न आल्याने काम अपूर्णांवस्थेत असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. तसेच म्हात्रे पुलाखालून सदर रस्ता नदीपात्रातील रस्त्याला कसा जोडणार याबाबत ही संभ्रम आहेच.
तरीही संबंधित कंत्राटदारास सहा महिन्याची मुदतवाढ देऊन दहा वर्षात पूर्ण न झालेले रखडलेले काम पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवणारे प्रशासन कौतुकास पात्र आहेच. या रस्त्याबाबतीत सर्व स्तरांवर बैठका, प्रत्यक्ष पाहणी, जगामालकांसोबत पाहणी असे सर्व सोपस्कार वेळोवेळी पूर्ण करून ही काम मात्र अपूर्ण असल्याचे विदारक चित्र असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
*सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रशासन जरी रस्ता 36 मीटर चा असल्याचे सांगत असले तरी शिवणे ते लभडे फार्म 24 मीटर, लभडे फार्म ते म्हात्रे पूल 30 मीटर, संगमवाडी ते येरवडा 30 मीटर आणि येरवडा ते खराडी 24 मीटर अशीच प्रत्यक्षात आखणी करण्यात आली आहे*.त्यामुळे हा रस्ता भविष्यात जेव्हा कधी होईल तेव्हा त्याची रुंदी किती असेल याबाबत ही प्रशासनाने संभ्रम दूर करावा अशी भूमिका संदीप खर्डेकर यांनी मांडली आहे.नारायणी लॉन्स समोर असेल अथवा घरकुल लॉन्स लगत, वाहनचालक त्रस्त अशी स्थिती आहे.पंडित फार्म समोर तर जिथे रिटेनिंग वॉल वा दुसऱ्या लेन चे काँक्रिटीकरणाचे काम होणार आहे तिथे जागा मालकाने पत्रे लावले आहेत व याबाबत ही मनपा कोणतीही कारवाई करत नाही हे सगळेच अचंभित करणारे आणि प्रशासकीय अनास्थेचे प्रतीक आहे.
आता दशकपूर्ती च्या निमित्ताने तरी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा रस्ता पूर्ण करावा अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.