भटक्या-विमुक्त व गुन्हेगारी जमातीचा शिक्का बसलेल्या समाजातून आलेल्या व त्याच समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी झटणाऱ्या शिवलाल जाधव यांचे संपूर्ण आयुष्य दीपस्तंभासारखे राहिले आहे असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केले. एस.एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे आयोजित प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. आपल्या आजूबाजूला जाती-धर्माच्या नावावर दलित,भटके,स्त्रिया यांचे शोषण मोठ्या प्रमाणावर आजही होत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ.शिवलाल यांच्यासारख्या संघर्षशील व रचनात्मक काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. भटक्या समाजातील रचनात्मक व संघर्षशील कार्यकर्ते डॉ.शिवलाल जाधव यांनी स्वत: आत्मकथन केलेल्या आयुष्याचे चित्रण व त्यांच्यावर डॉ.बाबा आढाव,डॉ.बाळकृष्ण रेणके, भाई वैद्य, डॉ.रामनाथ चव्हाण या मान्यवरांनी लिहिलेल्या लेखाचे संकलन असलेल्या ‘अनाथांचा बाप’ या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. मैत्री पब्लिकेशन प्रकाशित अनाथांचा बाप या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी मंचावर इतिहास अभ्यासक डॉ.नारायण भोसले,डॉ. देवकुमार अहिरे, लेखक डॉ. शिवलाल जाधव व प्रकाशक मोहिनी कारंडे यांची उपस्थिती होती. भटक्या विमुक्त समाजातील टकारी या गुन्हेगार ठरविल्या गेलेल्या जमातीतील व्यक्तीचा स्वतःच्या मुक्तीचा व समाजातील अन्य लोकांना आपल्यासमवेत शिक्षणाच्या आधाराने समृद्धीच्या मार्गावर आणण्याचा संघर्ष यात रेखाटण्यात आला आहे. प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने आपले आत्मचरित्र लिहिण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून डॉ.देवकुमार अहिरे यांनी डॉ. शिवलाल यांनी पुस्तकात शिक्षणाने मानवविकास कसा साध्य करता येतो याचे एक आदर्श उदाहरण म्हणून या पुस्तकाच्या वाचनाची गरज अधोरेखित केली. इतिहासाचे साधन म्हणून आत्मकथनाचे एक विशेष महत्व आहे. आपल्या काळाचा इतिहास डॉ.शिवलाल यांनी या कथनात मांडला असून आपल्या परीने अनाथ मुलांच्या प्रश्नाला भिडण्याचे काम त्यांनी केले असल्याचे डॉ.नारायण भोसले यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले. प्रास्ताविक रतनलाल जाधव यांनी तर आभार प्रदर्शन विजय फापाळे यांनी केले. कार्यक्रमाला विलास वाडेकर, धनंजय जाधव, प्रा.विनायक लष्कर, अमरनाथ सिंग, भालचंद्र सावंत,संजीवनी घळसासी यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पुस्तक : अनाथांचा बाप पृष्टसंख्या : १७६ किंमत : २५० मैत्री पब्लिकेशन : 9284617081