पुणे :
पुणे शहरातील मध्यवस्तीतील जुन्या झालेल्या वास्तू, लिफ्ट – पार्किंग सारख्या नसलेल्या सुविधा, राहण्याची कमी जागा… यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाचा (रिडेव्हलपमेंट) पर्याय गेल्या काही वर्षांत समोर आला आहे.पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया, पर्याय, अडचणी, शासकीय नियमावली, मिळणारा एफएसआय अशा अनेक कळीच्या मुद्दयांवर पुण्यात २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान विचारमंथन करण्यात येणार आहे.
वाढत्या पुण्याच्या नगर नियोजनात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या रिडेव्हलपमेंट ( पुनर्विकास ) विषयावर सर्वंकष विचार मंथन करण्याकरिता ‘गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज ‘ यांच्यातर्फे २६ ते २८ नोव्हेंबर रोजी ‘गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. गृह बांधणी विषयक प्रदर्शन, परिसंवाद, घर संकल्पनेला धरून काव्य आणि संगीत कार्यक्रम असे या फेस्टिवलचे स्वरूप आहे .
मनोहर मंगल कार्यालय येथे तीन दिवस हा फेस्टिवल होईल,अशी माहिती फेस्टिव्हलचे संयोजक राजेंद्र आवटे, गणेश जाधव,मकरंद केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या फेस्टिवलमध्ये 26 नोव्हेंबर शुक्रवार, पहिल्या दिवशी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ‘पुनर्विकासा समोरील आव्हाने आणि संधी ‘ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन ,कायदेतज्ञ ऍड .वसंत कर्जतकर, आर्किटेक्ट हर्षल कवडीकर हे या परिसंवादात सहभागी होतील .
शनिवार, 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात ‘गृहबांधणी हरित संकल्पनांची गरज ‘ या विषयावर चर्चा होईल. यामध्ये महापौर मुरलीधर मोहोळ, इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल ( आय जी बी सी ) पुणे चॅप्टर चे अध्यक्ष जे.पी. श्रॉफ सहभागी होतील.
रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ‘सुह्रद’ या गृहप्रकल्पाच्या अॅम्फी थिएटर मध्ये ‘घर संकल्पनेला अनुसरून काव्य ,संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
इमारतींची टेरेस धूळ खात पडून न राहता तेथे सांस्कृतिक कट्टे, वाय फाय झोन, टेरेस गार्डन अशा सुविधा निर्माण कराव्यात असा गंगोत्री होम्सचा आग्रह आहे. ‘ सुह्रद खुला मंच ‘ याच संकल्पनेतून तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन रविवारी अभिनेते मोहन जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
घर आणि नात्यांवर आधारित डॉ. माधवी वैद्य निर्मित ‘रंग संध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी सादर करण्यात येणार आहे. शर्वरी जमेनीस, धीरेश जोशी त्यात सहभागी होणार आहेत.
गृहबांधणी विषयक प्रदर्शन तीनही दिवस सकाळी 10 पासून सुरू असणार आहे ,अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
*पुनर्विकास’ प्रक्रियेसाठी मंथन*
“पुनर्विकासा’ची प्रक्रिया अतिशय किचकट असते हे खरे असले तरी बदलत्या काळानुसार आपल्याला योग्य सोयी-सुविधा मिळत असतील तर या पर्यायाचा अवलंब कसा करावा, याविषयी या परिसंवादात चर्चा करण्यात येईल. पुनर्विकास प्रक्रिया तज्ज्ञांच्या सल्ल्याने राबविल्यास ती प्रक्रिया सुरक्षित तर असतेच त्याचबरोबर सामान्य ग्राहकांसाठी किफायशीर देखील ठरते. इमारत विकसित करताना, आर्किटेक्टर,कायदे सल्लागार यांच्याशी सल्लामसलत करण्याची गरज असते. ही गरज खुद्द राज्यशासनाने बनविलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा पुनर्विकास
करण्याबाबतच्या निर्देशांमध्ये (Redevelopment Guidelines) मांडली आहे. युनिफाईड डेव्हलपमेंट ची नियमावली , पुनर्विकासासाठी तज्ज्ञ कन्सल्टंट नेमण्याची शासनाने केलेली सूचना, पालिकेची विकसन नियमावली, विविध करारनामे, सोसायट्यांमधील मतभेद, पुनर्विकास रखडू नये म्हणून घ्यायची काळजी या मुद्द्यांबद्दल या परिसंवादात चर्चा होणार आहे.