पुणे : भारतीय कुक्कुटपालनाचे जनक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव यांच्या जन्मदिनानिमित्त देशव्यापी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या मंगळवारी (१६ नोव्हेंबर) ‘नॅशनल चिकन डे’ साजरा केला जाणार आहे. या चिकन डे निमित्त विविध उपक्रम आयोजिले असून, सवलतीच्या दरात चिकनचे वितरण केले जाईल, अशी माहिती पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी विश्वस्त पांडुरंग सांडभोर, नाभाजी काळभोर, डॉ. डी. एच. कदम, राजू भोसले, राजेंद्र थोरात, शाम भगत, डॉ. शंकर मोधे, डॉ. पी. जी. पेडगावकर आदी उपस्थित होते.
वसंतकुमार म्हणाले, “चिकनबाबत अनेकदा गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे पोल्ट्री फार्मर्स आणि चिकन विक्रेत्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिकन बाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत आहे. पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर असोसिएशन महाराष्ट्र, कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स ब्रीडर्स असोसिएशन, पश्चिम बंगाल पोल्ट्री फेडरेशन यांच्याकडून देशभरात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. स्वस्त दरात चिकन विक्री, जागृतीपर कार्यक्रम, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन या जागृती अभियानात करण्यात येत आहे.”
पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन अर्थात कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादक संघ महाराष्ट्र, ही संस्था गेल्या दोन दशकांपासून कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत आहे. जवळपास १०० हून अधिक कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादक संस्थेचे सभासद आहेत. संस्थेच्या सभासदांकडुन एकत्रितपणे महिन्याला चार कोटी ब्राॅयलर प्लेसमेंट केली जातात. जवळपास गेली दोन दशके संस्था, अव्याहतपणे कुक्कुट पालक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम करत आहे. राज्य तसेच केंद्र सरकारपुढे सभासदांचे प्रतिनिधित्व संस्था करते.
कुक्कुटपालक शेतकऱ्यांबाबत निर्णय घेताना संस्था शासनापुढे शेतकऱ्यांची बाजु मांडते. बाजारातील मागणीच्या प्रमाणात संतुलित व योग्य गुणवत्तेच्या मालाच्या पुरवठयासाठी संस्थेने भरीव काम केले आहे. त्याचा महाराष्ट्रासह शेजारी राज्यातील पोल्ट्री उदयोगाला लाभ मिळत आहे. सणवारानुसार उत्पादनाचे नियोजन, त्यासाठी उत्पादनात करावी लागणारी कपात, उत्पादन नियंत्रणासाठी वेगवेगळया उपाययोजना करणे, ही संस्थेच्या कामाची वैशिष्टे आहेत. यासाठी सर्वांना विश्वासात घेवून काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो, असेही त्यांनी नमूद केले.