मुंबई, दि.६ अधिवेशन काळात सभागृहाचे वेळापत्रक ठरलेले असते. कामकाजाच्या वेळेनुसार आपल्या मतदारसंघातील विषयांची निवड करून त्याचा अभ्यास करून योग्य वेळी त्या त्या विषयांनुसार लोकप्रतिनिधींनी सभागृहात अभ्यासपूर्ण बोलले पाहिजे असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्य शाळेचा समारोप डॉ. गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने झाला.
यावेळी संसदीय कार्य मंत्री अँड.अनिल परब,मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे सदस्य, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समारोप भाषणात उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोकप्रतिनिधी सभागृहात काय बोलत आहेत यावर सर्वांचे लक्ष असते. समाज माध्यमांमुळे सभागृहाच्या कामकाजाची माहिती तातडीने प्रसारित होत असते. लोकप्रतिनिधींना सभागृहात मांडलेले विषय आपल्या मतदार संघात दाखवता येतात. आपण केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळते.त्याचा फायदाच होत असतो. त्यामुळे कामाचे नियोजन करून सभागृहात अभ्यासपूर्ण बोलले पाहिजे केलेल्या कामाला प्रसिद्धी सुद्धा दिली पाहिजे.
लोकप्रतिनिधींना खूप अधिकार आहेत त्या अधिकाराचा जनतेच्या विकासकामांसाठी उपयोग केला पाहिजे. सभागृहाच्या कामकाजानुसार विषयांची वर्गवारी करून लक्षवेधी, प्रश्नोत्तरे औचित्याचे मुद्दे, कायदे विधेयक, अर्थसंकल्प हे कामकाज समजून घेऊन आपल्या मतदारसंघातील विषय सभागृहात मांडण्यासाठी वेळेचे नियोजन केले पाहिजे. सभागृहात बोलण्यासाठी वेळ मिळाला नाही तर प्रत्येक पक्षाला दिलेला वेळ असतो त्यानुसार आपण वेळ घेतला पाहिजे.जर वेळ सभागृहात वेळ मिळाला नाही तर सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना भेटून आपला विषय समजून सांगून त्या विषयाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आशा सूचना देऊन श्रीमती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उपसभापती म्हणून
आम्ही जेव्हा सभागृहाचे कामकाज पहातो त्यावेळी नवीन लोकप्रतिनिधींना बोलण्याची संधी दिली आणि ते लोकप्रतिनिधी विषयाला धरून सभागृहात बोलले तर त्यांना दिलेल्या संधीचा आनंद होतो. असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले
या दोन दिवसीय कार्यशाळेत अ) अर्थसंकल्पाची प्रक्रिया ब) अर्थसंकल्पीय प्रकाशने समजावून घेताना (आर्थिक पाहणी अहवाल… राज्याच्या प्रगतीचे प्रतिबिंब) क) अर्थसंकल्पावरील चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग ड) विधिमंडळ सदस्यांचा स्थानिक विकास निधी व त्याचा सुनियोजित वापर इ) अर्थसंकल्पातून होणारी विकासकामे, त्यांचे नियोजन आणि पाठपुरावा या विषयांवर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले.
आणि प्रत्येक व्याख्यानानंतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे देऊन मार्गदर्शन केले.