पुणे : “कोरोना महामारीच्या काळात गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. लष्करातील जवान सीमेवर देशाचे आणि देशातील नागरिकांचे रक्षण करून देशसेवा करतात. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत जनजागृतीचे सेवाभावी काम सामाजिक संस्था आणि गणेश मंडळे करताहेत. हीदेखील एकप्रकारे देशसेवाच आहे,” असे मत निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने कोरोना काळात विशेष कार्य करणार्या कोरोना योद्ध्यांचा सत्कारावेळी भूषण गोखले बोलत होते. प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर उपस्थित होते. गोखले यांच्या हस्ते डॉ. पराग रासने, डॉ. अमरदीप मेहेत्रे, डॉ. सागर रोकडे आणि सान्वी रोकडे, सुनील दरेकर, मनीषा फाटे, रोहन पायगुडे, अभिजीत ताटके, किरण सावंत, संकेत शिंदे, ऋषिकेश भिसे, अरुण गवळे, अक्षय संभुस यांच्यासह वंदे मातरम संघटनेचे सचिन जामगे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरचे राजाभाऊ बलकवडे यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी. गणेश मंडळांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतानाच सर्व काळजी घेऊन उत्सव साजरे करावेत, असे आवाहनही भूषण गोखले यांनी केले. युवराज निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. स्वप्नील खडके यांनी सूत्रसंचालन केले.